Hot Posts

6/recent/ticker-posts

गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी लावण्यासाठी मनाई : उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके

 गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी लावण्यासाठी  मनाई : उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
नातेपुते पोलिस ठाणे व नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने गणेशोत्सव निमित्त गणेश मंडळाची बैठक अहिल्यादेवी सभागृहात आयोजित केली होती. यावेळी गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी लावण्यासाठी सक्त मनाईच्या सूचना देण्यात आल्या.आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा करून समाजात आदर्श निर्माण करावा, असा सल्ला अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिला आहे. गणेशोत्सवात कुठलाही आक्षेपार्ह देखावा सादर न करता धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन करून
गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी लावण्यासाठी सक्त  मनाई असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी शांतता सलोखा बैठकीत सांगितले. 
                                       यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोसई धनाजी ओमासे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच विद्युत वितरण विभागाचे अक्षय निकम, माऊली उराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड, सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन रणवीर देशमुख, जिल्हा सैनिक प्रतिनिधी राजेंद्र आढाव, पोलीस पाटील औदुंबर बुधावले हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की, मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, मिरवणुकीच्या वेळेत वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. वर्गणी जबरदस्तीने उकळल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होईल. गणपती मंडप वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज जोड अधिकृत वीज कंपनीकडूनच घ्यावी.सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे समाजातील निर्माण होईल असे बॅनर लावू नये सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन अर्ज भरून रीतसर परवानगी घ्यावी तसेच सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन शांतता सलोखा बैठकीच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी उपस्थित गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना केले.
यावेळी मागील वर्षी सामाजिक उपक्रम राबवलेल्या गणेश मंडळांना नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली यामध्ये लोकमान्य टिळक गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ उत्कृष्ट देखाव्यामध्ये हनुमान गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, शंकर नगर गणेश मंडळ, आदर्श मंडळामध्ये सह्याद्री गणेश मंडळ, सटवाई माता गणेश मंडळ, श्रीमंत मल्हार गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ वरील सर्व गणेश मंडळांना वरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने प्रत्येक मंडळाला पाच कुंड्या व बॅग चे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक नातेपुते पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी अमोल देशमुख यांनी केले तर आभार पोलीस पाटील औदुंबर बुधावले यांनी मानले.शांतता सलोखा बैठकीसाठी नातेपुते व परिसरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील पोलीस पाटील व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौकटीत :

अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिर, विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत,शक्यतो शाडूच्या मूर्तींचा वापर करावा, प्लॅस्टिकचा वापर टाळावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये  व सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, 
     अतुल पाटील ( उपनगराध्यक्ष नातेपुते नगरपंचायत )

फोटो ओळी :
अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना गणेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी

Reactions

Post a Comment

0 Comments