मानेगाव येथे सकल मराठा समाजाचा मेळावा
मानेगाव (कटूसत्य वृत्त):- शासनाने सकल मराठा समाजाचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे ओबीसी संवर्गातून सरसकट आरक्षण दिले पाहिजे. 'सगेसोयरे' अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे, आदी
मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या भव्य विराट मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने समर्थकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी केले आहे.
मानेगाव (ता. माढा) येथे आयोजित सकल मराठा समाज व इतर समाजातील मराठा आरक्षण समर्थकांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना माऊली पवार यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी वेळोवेळी आमरण उपोषण, भव्य विराट मोर्चे व आंदोलने करून मराठा समाजातील सुमारे ५८ लाख जणांना कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळाले आहे. उर्वरित मराठा समाज व त्यांच्या सगेसोय-यांना सरसकट ओबीसी संवर्गातून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. या उद्देशाने हा मोर्चा व आंदोलन केले जाणार आहे. शासनाचा वेळकाढूपणा व दिरंगाईचे धोरण हे मराठा समाजासाठी अन्यायकारक आहे. समाजाला न्याय व हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका जरांगे-पाटील यांची आहे.
यावेळी बुद्रुकवाडी येथील सकल मराठा समाजाच्या तीघांना कुणबी-मराठा समाजाचे प्रमाणपत्राचे वितरण जिल्हा समन्वयक माऊली पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानेगाव व परिसरातील गावांतील सकल मराठा समाजाचे लोक उपस्थित होते.
0 Comments