Hot Posts

6/recent/ticker-posts

केळी निर्यातकरिता केलेल्या योगदानाबद्दल 'विठ्ठलगंगा'चा गौरव

 केळी निर्यातकरिता केलेल्या योगदानाबद्दल 'विठ्ठलगंगा'चा गौरव

कन्हेरगांव (कटूसत्य वृत्त):-  तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे आय. सी.ए.आर. राष्ट्रीय केळी  संशोधन केंद्राच्या ३२ व्या वर्धापन दिन व किसान मेळाव्याचे औचित्याने आयोजित समारंभात विठ्ठलगंगा

फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला 'बेस्ट बनाना एफपीसीएल अॅवार्ड' ने गौरविण्यात आले.


हा पुरस्कार केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी, शाश्वत शेती पद्धतींसाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार भारतीय केळी निर्यात करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्हा हा देशातील सर्वात मोठ्या केळी उत्पादक पट्ट्यांपैकी एक आहे. या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय व शाश्वत शेती पद्धती, निर्यातीसाठी आवश्यक दर्जा नियंत्रण व प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम विठ्ठल गंगा एफपीसीएलने केले आहे. अत्याधुनिक पॅक हाऊस सुविधा, मोठ्या क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, आधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्ता तपासणी यंत्रणा, शेती निविष्ठा विक्री केंद्रे आणि शेतमालाचे थेट करार पद्धतीने विक्री यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


याप्रसंगी राष्ट्रीय केळी संशोधन  केंद्राचे संचालक डॉ. सेल्वाराजन यांनी विठ्ठलगंगा एफपीसीएलच्या कार्याचे कौतुक करताना, 'संशोधनाधिष्ठित शेती, दर्जा नियंत्रण आणि निर्यातीसाठी लागणाऱ्या वैज्ञानिक पद्धती यांचा प्रभावी वापर करून विठ्ठलगंगा एफपीसीएलने देशातील इतर एफपीसीएलसाठी आदर्श निर्माण केला आहे,' असे प्रतिपादन केले.


चौकट 

हा सन्मान प्रत्येक शेतकऱ्याचा

हा पुरस्कार केवळ आमच्या संस्थेचा नाही तर प्रत्येक शेतकरी सदस्याच्या मेहनतीचा आणि सर्व भागीदारांच्या विश्वासाचा गौरव आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आम्ही शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी

आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आगामी काळात विठ्ठलगंगा एफपीसीएलचे ध्येय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रक्रिया व पॅकिंग युनिट्स उभारणे, नव्या बाजारपेठांशी व्यापार करार करणे तसेच भारतीय केळीला 'जागतिक ब्रॅण्ड' म्हणून ओळख निर्माण करणे हे असेल.

- धनराज शिंदे, चेअरमन,

विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

Reactions

Post a Comment

0 Comments