Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात मोकाट जनावरांवर महापालिकेची कठोर कारवाई

सोलापूरात मोकाट जनावरांवर महापालिकेची कठोर कारवाई



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या वाढत्या समस्येमुळे सोलापूर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रशासक ठराव मंजूर करण्यात आला आहे.
दि. 11 जुलै रोजी महापालिकेत जनावरे मालक व व. पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व जनावरांना इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी मालकांना एका महिन्यापेक्षा अधिक मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने महापालिका थेट कारवाई करणार आहे.
कारवाईचे नियम :
इअर टॅगिंग असलेली जनावरे
पहिल्यांदा मोकाट आढळल्यास :
मोठे जनावर ₹10,000 दंड,
लहान जनावर ₹5,000 दंड.
दुसऱ्यांदा मोकाट आढळल्यास :
मोठे जनावर ₹20,000 दंड,
लहान जनावर ₹10,000 दंड.
पुन्हा मोकाट आढळल्यास :
जनावर कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येईल.
इअर टॅगिंग नसलेली जनावरे
अशी जनावरे थेट कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येतील. यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.
जनावरे सोडवून घेण्याची प्रक्रिया
जप्त झालेली इअर टॅगिंग असलेली जनावरे सोडवून घेण्यासाठी मालकाने दंड भरल्याची पावती, ₹100 च्या बॉण्ड पेपरवरील स्वयंघोषणापत्र (२ साक्षीदारांच्या स्वाक्षरीसह) सादर करावे लागेल. ही प्रक्रिया १० दिवसांच्या आत पूर्ण केल्यासच जनावरे परत मिळतील.
महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे आवाहन
सोलापूर महापालिकेने सर्व जनावर मालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी तात्काळ आपल्या जनावरांचे इअर टॅगिंग करून घ्यावे व जनावरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे.

 

Reactions

Post a Comment

0 Comments