Hot Posts

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा, कॉरिडॉर रद्द करा

लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा, कॉरिडॉर रद्द करा



पंढरपुरात बाधित कुटुंबातील महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवल्या 'नो कॉरिडॉर'च्या राख्या
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  'लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा, कॉरिडॉर रद्द करा, लाडक्या बहिणींना ओवाळणी, कॉरिडॉरची करा बोळवणी', अशा घोषणा देत पंढरपूर कॉरिडॉर बाधित कुटुंबातील महिलांनी गुरुवारी येथे अनोखे आंदोलन केले. याचवेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत त्यांना 'नो कॉरिडॉर, नो डीपी'च्या राख्या पोस्टाने पाठविण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरसाठी सध्या राज्य शासनाकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. मात्र, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने वेळोवेळी आंदोलने करीत येथील प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध केला आहे. याचाच एक भाग म्हणून बाधित कुटुंबातील महिलांनी शहरात चौफाळा येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर अनोखे आंदोलन केले. ज्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊंचं सरकार यावं यासाठी देव पाण्यात ठेवले होते, त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये, अशी मागणी महिलांनी केली. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने एकत्र आलेल्यामहिलांनी 'नो कॉरिडॉर, नो डीपी'चे लेबल लावलेल्या राख्या तयार केल्या होत्या. या राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या. तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्ताचा टिळा लावला. तसेच ओवाळून 'नो कॉरिडॉर, नो डीपी'च्या राख्या देखील बांधल्या.
यावेळी बोलताना भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे म्हणाल्या, लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून तसेच राज्यात पुन्हा देवाभाऊंचे सरकार यावे यासाठी महिलांनी भरभरून मतदान केले होते. मात्र, हेच सरकार आमच्या घरावर आता वरवंटा फिरवत आहे. यास आमचा कडाडून विरोध असून सरकारने प्रस्तावित कॉरिडॉर रद्द करून लाडक्या बहिणींचा आदर ठेवावा.
Reactions

Post a Comment

0 Comments