फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत
भाजप आमदार- खासदारांचे फोन
अहिल्यानगर (कटूसत्य वृत्त):- भाजपमधील अनेक मराठा नेते मला फोन करून सांगतात की त्यांना त्रास दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मला ३० ते ३२ आमदार व खासदारांचे फोन आले आहेत; असा धक्कादायक खुलासा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबई येथे २९ ऑगस्टला आंदोलन छेडण्यात आले आहे. या अनुषंगाने जरांगे पाटील हे ठिकठिकाणी जाऊन मराठा समाज बांधवांची भेट घेऊन संवाद साधत आहेत. यात अहिल्यानगर जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आरोप केले आहेत.
फडणवीसांनी पक्षाची दिशा बदलली
दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस मराठ्यांचे नेते आणि अधिकारी संपवण्याच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक मंत्र्यांना फडणवीस यांनी स्वतःचे OSD दिले आहेत. भाजप पक्ष वेगळा होता, पण फडणवीस यांनी पक्षाची दिशा बदलली आहे. सत्तेसाठी त्यांनी नारायण राणे, अजित पवार, राधाकृष्ण विखे, अशोक चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर भाजपमधीलच अनेक नेते संपवण्याचे कामही सुरू आहे.
मराठा नेत्यांचा दररोज फोन
तसेच सत्तेसाठी आपल्या लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे आणि माझ्याकडे त्याची यादी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जालन्यासह सोलापूर आणि नांदेड येथेही अनेक मराठा नेत्यांना त्रास दिला जात आहे. आमची परिस्थिती बिकट आहे असे सांगणारे नेते दररोज संपर्क साधत आहेत; असा दावा त्यांनी केला.
0 Comments