पुण्यात पुन्हा हुंडाबळी; सासरच्या जाचास कंटाळून नवविवाहीतेची आत्महत्या
पुणे (कटूसत्य वृत्त):- वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर शहरात पुन्हा एकदा हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. आंबेगाव येथील राहत्या घरी, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी स्नेहा सावंत-झेंडगे (मूळ रा. कर्देहळी, ता. दक्षिण सोलापूर) हिचा मृतदेह आढळून आला. हि आत्महत्या नसून नियोजित कटातून करण्यात आलेली हत्या असल्याचा आरोप मृत युवतीच्या माहेरच्यांनी केला आहे.
स्नेहा झेंडगे हिचा मे २०२४ मध्ये विशाल संजय झेंडगे (मूळ गाव: भांबेवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्याशी विवाह झाला होता. लग्नावेळी सर्व मानपान व स्त्रीधन दिले असूनही सासरकडून ५० लाख रुपयांची मागणी करत स्नेहाचा सतत मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ सुरू होता असे माहेरच्यांचे म्हणणे आहे.
कौटुंबिक हिंसाचार आणि छळाबाबत स्नेहाने यापूर्वी वालसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, सासरच्या लोकांनी दबाव निर्माण करून ही तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचे स्नेहाच्या आईवडिलांचे म्हणणे आहे.
तक्रार मागे घेतल्यानंतर सासरकडून पैशांसाठी पुन्हा स्नेहाचा छळ होऊ लागला. अखेर ९ ऑगस्ट रोजी राहत्या घरात स्नेहाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत नवरा विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे आणि सासू विठाबाई झेंडगे यांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात हत्या, हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळ, तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या घटनेने खळबळ उडाली असून समाजातील हुंडाप्रथा किती खोलवर रुजली आहे याचीच प्रचिती पुन्हा आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा व दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. “पैशाच्या लोभापायी मुलींचा जीव घेणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेऊ,” असा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
0 Comments