Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, विदर्भात चौघांचा, मराठवाड्यात दोघांचा मृत्यू

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, विदर्भात चौघांचा, मराठवाड्यात दोघांचा मृत्यू

मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा राज्यातील सर्वच विभागांना फटका बसला. विदर्भात विविध घटनांत चौघांचा बळी गेला, तर मराठवाड्यात भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला. विदर्भात अनेक जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली.

जळगाव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली, तर शेतात पाणी गेल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. कोकणातील रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. अनेक नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामध्ये सुबराव लांडगे नावाचा शेतकरी वाहून गेला. पावसामुळे भिंत पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. शेख नासेर आमीन व हसिना बेगम शेख अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. जालना तालुक्यातील नागेवादी येथेही भिंत पडल्याचे वृत्त आहे.

बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. धरण पातळीत मोठी वाढ झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मांजरा, तेरणा यांसह विविध धरणे भरली आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सिंदगी येथील प्रेमसिंग पवार हे वाहून गेले आहेत. ते शाळेचे वाहन चालवत होते. उमरी तालुक्यात कोलारी गावात घरात पाणी शिरले असून, किनवट- उमरखेडचा संपर्क तुटला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही चौका ते लाडसावंगी या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आली. धाराशिव जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पीक विम्याच्या निकषात शेतकऱ्यांच्या दृष्टीने बदल करण्यास सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विदर्भात पूरसदृश स्थिती

नागपूर : विदर्भात पावसामुळे चार जणांचा बळी गेला, दोन बेपत्ता आहेत तर तीन जण जखमी आहेत. शनिवारी अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, भंडारा आदी जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. बुलढाणा येथे शनिवारी मुसळधार पावसादरम्यान वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात गुराख्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात एक बैल आणि पुसद तालुक्यात दोन गायी वीज कोसळून दगावल्या. घाटंजी तालुक्यातील कोच्ची येथे शुक्रवारी संध्याकाळी वीज कोसळल्याने शेतात काम करीत असलेल्या मजुराचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील धारमोहा येथील भगवान भेंडे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. बाभुळगाव तालुक्यातील कोटंबा येथे अर्जुन उईके (६६) हे गुरे चारत असताना ज्योतिर्लिंग नदीत वाहून गेले.

जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांत अतिवृष्टी

जळगाव : जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था नाजूक झाली असताना शुक्रवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एरंडोलसह पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि रावेर तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. बऱ्याच ठिकाणी कच्च्या मातीच्या घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी नाल्याच्या काठावरील घरांसह दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात घरांसह दुकानांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. महसूल विभागाला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

रायगड, रत्नागिरीला झोडपले

अलिबाग : मुसळधार पावसाने कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना झोडपून काढले. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे भीरा जलविद्युत प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह, खेड, चिपळूण व संगमेश्वर या तालुक्यांना झोडपून काढले. संगमेश्वर माखजन बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

चार दिवस जोरदार सरींचा अंदाज पुणे : पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे असण्याची शक्यता आहे. येत्या २० ऑगस्टपर्यंत पुण्यासह राज्यभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोरसह मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments