मेंदू मृत व्यक्तीचेच अवयवदान; नेत्रदान व देहांगदान मृत्यूनंतरच केला जातो - योगीन गुर्जर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देहदान, नेत्रदान व अवयवदान यामध्ये ढोबळ स्वरुपात तीन भाग आहेत. अवयवदान व देहदान - नेत्रदान यामध्ये फरक आहे. 'देहदान' हे नैसर्गिक मृत्यू झाल्यावरच केले जाते. सदरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया केली नसावी. तसेच गंभीर स्वरुपाचे आजार किंवा कँसर वैगेरे असू नयेत. अशा व्यक्तीचेच देहदान संबंधित यंत्रणेकडून स्वीकारले जाते. त्याचबरोबर 'नेत्रदान'ही मृत्यूनंतरच डोळे संपूर्ण न काढता केवळ वीस मिनिटात विशिष्ठ प्रकारात काढून एका मृत व्यक्तीचे किमान चार गरजू व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लावतात. यासंदर्भात तज्ञ डॉक्टर्स सोलापूरात मोजकेच आहेत. त्यापैकी डॉ. तन्वांगी जोग आहेत. 'अवयवदान' हे मेंदू मृत (ब्रेन डेथ) झालेल्या व्यक्तीचेच केला जातो. यासंदर्भात समाजामध्ये समज - गैरसमज आहेत. याची माहिती प्रत्येकांने घेऊन या संदर्भात चळवळ उभे करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था व दधिची अवयवदान प्रचारक संघ या संस्थेचे सक्रीय कार्यकर्ते योगीन गुर्जर यांनी केले आहे.
१३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा करतात. याचे औचित्य साधून, सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात जीवनदान देणा-या नातलगांचे सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जोग नेत्रपेढीच्या डॉ. तन्वांगी जोग, वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, अरविंद चिनी, फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांची उपस्थिती होती. गुर्जर पुढे बोलताना म्हणाले, मेंदू मृत झाल्यास किंवा व्हेंटीलेटरवर असलेल्या व्यक्तीचेच अवयवदान करण्यात येत असल्याने मृत व्यक्तीचे इच्छा किंवा कुटूंबाचा निर्णय असल्यास रितसर पध्दतीने करण्यात येतो. यावेळी जोग नेत्रपेढीच्या डॉ. तन्वांगी जोग म्हणाल्या, पैशांने श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही, फक्त मनाने श्रीमंती आणि दान देण्याचे भाव असणे फार महत्वाचे आहे. म्हणून नेत्रदान, अवयवदान व देहांगदान हे सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांचे सत्काराचे कार्यक्रम हे स्तुत्य उपक्रम आहे. ज्या कुटूंबातील व्यक्तींचे नेत्रदान, अवयवदान आणि देहदान केले आहेत असे कुटूंब इतरांना प्रोत्साहीत करणारे आहेत. जोग नेत्रपेढीच्या डॉ. तन्वांगी जोग म्हणाल्या. कै. सतीश पलगंटी यांच्या मृत्युनंतर अवयवदान केलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पलगंटी, रामचंद्र अंजिखाने यांचे देहदान करण्यात आले होते. त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर (देवा) अंजिखाने, पुष्पावती इप्पलपल्ली यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांचे चिरंजीव प्रवीण जयप्रकाश इप्पलपल्ली आणि चेतन गुर्रम यांच्या मृत्युनंतर नेत्रदान करण्यात आले होते. त्यांचे बंधू लक्ष्मीनारायण गुर्रम अशाप्रकारे चौघांची सोलापूरी टॉवेल व गुलाब फूल देऊन सन्मान करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी व फाउंडेशन व सखी संघमच्या पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य मिळाले. प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन सखी संघमच्या समन्वयिका कला चन्नापट्टण यांनी केले आहे तर, फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, वैकुंठम् जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, वनिता सुरम, ममता तलकोकूल, गीता भूदत्त, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा यांचेही विशेष सहकार्य मिळाले आहे.
0 Comments