राज्यात ८ लाख ५१ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये १०८ तालुक्यांतील ८ लाख ४४ हजार ३४६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. २० ऑगस्ट रोजी हीच आकडेवारी ८ लाख ५१ हजार ११० हेक्टर होती. कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक अंदाजात ७ हजार हेक्टरने क्षेत्र घटले आहे.
राज्यात गुरुवारी (ता. २१) पाऊस कमी झाला असून अनेक ठिकाणचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे पंचनामे होणे अपेक्षित होते, मात्र कृषी विभागांच्या जाहीर केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात तफावत आली आहे.
राज्यात १५ ऑगस्टपासून झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे २० जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या अंदाजानुसार, ८ लाख ५१ हजार ११० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नांदेडमध्ये २ लाख ८५ हजार, ५४३, बुलडाण्यात ८९ हजार ७५८, अमरावतीमध्ये २३ हजार ५८३, वाशीममध्ये १ लाख ५१ हजार ७२३, यवतमाळमध्ये ९२ हजार ७२३, अकोल्यात ४३ हजार ७०३ वर्ध्यात ७७६, सोलापुरात ४१ हजार ४७२, अहिल्यानगर येथे ३ हेक्टर, सांगलीत १९९८, धुळ्यात २३, जळगावमध्ये १२,३३७, हिंगोलीगमध्ये ४० हजार, परभणीत २० हजार २२५, छ. संभाजीनगरमध्ये २०७४, जालन्यात ५१७८, बीडमध्ये १९२५, धराशिवमध्ये २८ हजार ५०० आणि लातूरमध्ये १० हेक्टरवर नुकसान झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पूर, तरीही अंदाज नाही
राज्यात सर्वदूर पाऊस झाला असून नुकसान झाले आहे. मात्र कृषी विभागाच्या नुकसानीच्या अंदाजात सोलापूर, सांगली वगळता अन्य जिल्ह्यांतील नुकसानीचा प्राथमिक अंदाज अद्याप जाहीर झालेला नाही. पंचगंगा, कृष्णा या मोठ्या नद्यांसह लहान-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. उसासह भुईमूग, भात, नाचणी आणि मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
0 Comments