Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोटमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत

 अक्कलकोटमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-   गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा गजरांनी आज अक्कलकोट शहर आणि तालुका उत्साहात न्हाऊन निघाला. घरोघरी मंगलमूर्ती विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना होताच वातावरण भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाने ओथंबून गेले. सकाळपासूनच नागरिकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि भाविकतेचे दर्शन घडत होते. घराघरांत फुलांची सजावट, पारंपरिक तोरणे, सुगंधी धूपकांडी आणि गोडधोडाचा सुगंध दरवळू लागला होता.

सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र गणेश आगमनाचा जल्लोष अधिक रंगतदार केला. वाजतगाजत, ढोल-ताशांच्या तालावर शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणुका काढून कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना केली. काही ठिकाणी सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली, पण भाविकांची श्रद्धा डगमगली नाही. ग्रामीण भागात तर अनेकांनी पावसातच लहान मुलांनी नाचत, भिजत आणि गात गणरायाचे स्वागत केले.

सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली होती. मूर्ती विक्रीच्या दुकानांबरोबरच डेकोरेशन, लाइट्स, पुष्पहार, तोरणे, वाजंत्री व पारंपरिक वस्तूंच्या दुकानदारांकडेही खरेदीसाठी लोकांची रांग लागली. ग्रामीण भागात संध्याकाळच्या सुमारास मोठ्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा झाला. अनेक घरांनी पंचांगातील शुभमुहूर्त साधत गणरायाला आमंत्रण दिले.

अक्कलकोट शहरातील नवभारत गणेश मंडळ आणि लोकमान्य गणेशोत्सव मंडळ यांची तयारी विशेष चर्चेचा विषय ठरली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सपत्नीक घरी गणरायाची स्थापना केली. तर माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य मंडळाने जुना अडत बाजार येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रतिष्ठापना केली. या मंडळाचे उपक्रम दरवर्षी शहराचे आकर्षण ठरत असून यंदाही नागरिकांच्या उत्सुकतेचे केंद्रबिंदू बनले.

यंदा अक्कलकोट तालुक्यात 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ४५ गावांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून मागील वर्षीच्या ४९ गावांच्या तुलनेत थोडा कमी प्रतिसाद दिसला तरी ग्रामीण भागात उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसतो आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या ५७ गावांपैकी १७ गावांमध्ये आणि दक्षिण पोलीस ठाण्याच्या ७४ गावांपैकी २८ गावांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.

शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस प्रशासनाने यंदा डीजेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर रक्तदान शिबिरे, समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याची सूचनाही करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात आणि ग्रामीण भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तर ठाण्याच्या हद्दीत ४ पोलीस अधिकारी, ३५ अंमलदार, एसआरपीएफची तुकडी आणि ६५ होमगार्ड तर दक्षिण ठाण्यात ३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. नगरपरिषदेकडून ठिकठिकाणी फिक्स पॉईंट ठेवून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. वाहतुकीचे नियोजन आणि स्वच्छतेची यंत्रणा सज्ज ठेवून गणेशभक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments