मोहोळ तालुक्यातील मराठा बांधवांचा मुंबईच्या दिशेने एल्गार
नरखेड (कटूसत्य वृत्त):- सकल मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे मागील अनेक वर्षापासून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. एमपीएससी, यूपीएससी, मेडिकल,इंजिनिअरिंगसह नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे रात्रन् दिवस अभ्यास करून देखील संधी मिळत नाही. कुणबी आणि मराठा एकच असताना ५८ लाख पुरावे असताना विविध गॅझेट करारामध्ये कुणबी व मराठा एक असलेले जे पुरावे आहेत. तरीसुद्धा शासन आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवत आहे. त्यामुळेच आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्यासाठीच आम्ही निघालो आहोत. घरात बसला तो मराठा कसला...,कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय येत नाही... अशा घोषणा देत मोहोळ तालुक्यातील मराठा समाज भर पावसात मुंबईकडे रवाना झाला आहे.
सकल मराठा समाजाला सगेसोयरे अध्यादेश लागू करून ओबीसी मधून आरक्षण मागणीसाठी आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोहोळ तालुक्यातील समाज बांधव गुरुवार, दि.२८ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारीच मुंबईच्या दिशेने भर पावसातच मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन रवाना झाले आहेत.यामध्ये मोहोळ शहरासह तालुक्यामधून शेकडो गाड्यांचा ताफा निघणार आहे.
स्टिकर, झेंडे, अंथरुण, पांघरून, पेस्ट ब्रश, साबण, पाणी, किराणामाल, गॅस, आचारीसह जीवनावश्यक वस्तू पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढा अन्नधान्य साठा घेऊन आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तर काही वाहने आज गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान निघणार असून त्याची तयारी पूर्ण केली आहे. तर काही बांधव बुधवारीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सोलापूरवरून सकल मराठा समाज बांधव सकाळी साडेनऊ दरम्यान सोलापूर येथून निघणार आहेत.

0 Comments