राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे चालू करा
आमदार पाटील यांच्या सूचना
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  येथील अंतर्गत रस्त्यातील त्रुटी एक महिन्यानंतर पूर्ण करून घेतल्या जातील, सध्या पथदिवे तातडीने चालू करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गावरील अधिकारी व ठेकेदाराला देण्यात आल्या असून गणपती विसर्जनानंतर टेंभुर्णी येथे जनता दरबार घेण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार अभिजित पाटील यांनी केले.
 टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्यावतीने शहरातील अंतर्गत काँक्रीट रस्त्याच्या एनओसी देण्यासंदर्भात होत असलेल्या उलटसुलट चर्चा संदर्भात सरपंच सुरजा बोबडे यांनी महामार्गाचे अधिकारी स्वप्निल कासार, ठेकेदार, विद्युत मंडळाचे अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार अभिजित पाटील उपस्थित होते.
प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी अंतर्गत झालेल्या काँक्रिटीकरण रस्त्यातील
त्रुटींचा पाढाच वाचला. रस्त्यावर साचणारे पाणी हायमास्ट दिवे, गतिरोधक अंतर्गत जोडरस्ते हे
प्रश्न त्यांनी मांडले. ही कामे करून घेतली तरच ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र देईल ही भूमिका त्यांनी मांडली. यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून ठेकेदाराने दिलेली लेखी आश्वासने व रस्त्यातील असणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात असे सांगितले.
दरम्यान एक महिन्यात सर्व कामे करून दिली जातील व इस्टिमेटप्रमाणे काम झाले आहे की नाही, याची खातरजमा आम्ही करून घेऊ, असे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी कासार यांनी सांगितले.
या बैठकीला रावसाहेब देशमुख, प्रमोद कुटे, औदुंबर देशमुख, सुरेश लोंढे, उपसरपंच सतीश नेवसे, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात, शैलेश ओहोळ, गौतम कांबळे, गणेश केचे, गोरख देशमुख, विद्युत मंडळाचे अधिकारी पवार उपस्थित होते. आभार ग्रामसेवक संजय साळुंखे यांनी मानले.

0 Comments