Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री साहाय्यता निधी – गरजूंचा जीवनदायक आधार

 मुख्यमंत्री साहाय्यता निधी – गरजूंचा जीवनदायक आधार  



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री साहाय्यता निधी. दुर्धर व महागड्या आजारांवर उपचाराची आशा या योजनेमुळे बळकट झाली आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही मदत प्राणवायू ठरत आहे.

सोलापूरमध्ये जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष नियोजन भवन,  सात रस्ता, सोलापूर येथे कार्यरत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा, हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कर्करोग, हृदयशस्त्रक्रिया यासारख्या उपचारासाठी लाखो रुपयांची मदत मिळते.

अर्जासाठी आवश्यक पात्रता

- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा  
- वार्षिक उत्पन्न ₹1.60 लाखांच्या आत असावे  
- रुग्ण सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेत असावा  

मदतीस पात्र आजार

अंतस्त कर्ण रोपण, हृदय/यकृत/मूत्रपिंड/फुप्फुस/अस्थिमज्जा प्रत्यारोपण, कर्करोग किमोथेरपी, रेडिओथेरपी, नवजात शिशुंचे आजार, मेंदूचे रोग, डायलेसिस, विद्युत अपघात आदी गंभीर आजारांचा समावेश. उपचारासाठी आजारानुसार रू. 2 लाखांपर्यंतची मदत मंजूर होते.

अर्ज प्रक्रिया

रुग्णालयातून प्रस्ताव तयार होतो व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तो मंत्रालयात पाठवला जातो. समिती परीक्षण करून निधी मंजूर करते. प्रक्रिया पारदर्शक व रुग्णकेंद्रित आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

- वैद्यकीय प्रमाणपत्र व रुग्णालयाचे खर्चाचे अंदाजपत्रक  
- उत्पन्न प्रमाणपत्र, आधार/रेशन कार्ड  
- आजारासंबंधी निदानात्मक माहिती  
- अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर  
- अवयव प्रत्यारोपणासाठी समन्वय समितीचा अहवाल  

 चौकट

"या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळतो आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या उपचारांमुळे लहान मुलांना नवीन जीवन मिळाले आहे. वेळेवर उपचार झाल्याने कर्करोग, हृदयरोग यावर मात करणारे अनेक रुग्ण आज सुदृढ जीवन जगत आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष हे गरजूंना उपचारासाठी मिळणारी बहुमोल आर्थिक मदत आहे."  
डॉ. अविनाश खांडेकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कक्ष, सोलापूर
Reactions

Post a Comment

0 Comments