Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शिवसेनेत अंतर्गत गटबाजीचे राजकारण

 सोलापूर शिवसेनेत अंतर्गत गटबाजीचे राजकारण



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना पक्षातील गटाबाजीमुळे राज्यात विभागणी झाल्यानंतर याचे लोण सध्या सोलापूर जिल्ह्यातही पोहोचले आहे. सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांना निर्णय प्रक्रियेतून डावलायला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर

सावंत यांच्या समर्थनार्थ अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केल्यावर पक्षाचे निरीक्षक आ. संजय कदम यांनी बैठक बोलावली होती. पंढरपुरात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या बैठकीत पक्षाचे निरीक्षक आ. संजय कदम यांच्या समोर सावंत व साठे गट एकमेकांना भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.


शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला आहे. सोलापूर व पंढरपूर या ठिकाणी शिवसेनेतील सावंत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सञ सुरू केले आहे.


अंतर्गत गटाबाजी सुरू झाल्याने यास आवर घालण्यासाठी पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. सोमवारी पक्षाचे निरीक्षक आ. संजय कदम यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.


यावेळी माजी मंत्री सिद्धाराम  म्हेत्रे, माजी आमदार शहाजी पाटील, साईनाथ अभंगराव, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, संजय साठे, चरणराज चवरे, अमोल शिंदे, प्रियांका परांडे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी शिवाजी सावंत यांच्या समर्थकांनी पक्षातील एका गटाकडून पक्षाची दिशाभूल केली जात आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर दोन गट एकमेकांना भिडले. सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत विरुद्ध महेश साठे असे दोन गट आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची गटबाजी पक्षाला अडचणी वाढवणारी ठरणार आहे.


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गावागावात बैठका घेण्यात येत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढविण्याऐवजी नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद होऊ लागले असल्याचे दिसून येत आहे.


सोलापूर जिल्ह्यातील पक्षाची पडझड रोखण्यासाठी व या प्रकरण चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरीक्षक यांना पाठविले होते. पक्षनिरीक्षकांसमोरच दोन्ही गट भिडल्याने पक्षातील अंतर्गत राजकारण चव्हाटयावर आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहेत.


चौकट

नेत्यांमध्ये अंतर्गत कुरघोडी

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने राजीनामा दिलेले पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढविण्याऐवजी नेत्यांमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments