Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर परिसरात नागपंचमी उत्साहात साजरी

 सोलापूर शहर परिसरात नागपंचमी उत्साहात साजरी  




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  नागनाथ मंदिरांमध्ये मंगळवारी महिलांनी नागदेवतेचे पूजन करून नागपंचमी सण भक्‍तिभावात साजरा केला. अनेक ठिकाणी उभारलेल्या झोक्यावर पिंगा घेत आनंद घेतला. शहरातील विविध नागमंदिरात पूजनासाठी व दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती.घरोघरी महिलांनी नागदेवतेला भाऊ म्हणून पूजन करून भावाच्या दीर्घायुष्याची मनोकामना केली. पारंपारिक वेशभूषा करून महिलांनी ठिकठिकाणी झोका खेळण्याचा आनंद लुटला. झोका खेळताना महिलांचा आनंद व चैतन्याच्या लहरी सणाची शोभा वाढवत होत्या. भक्तिभाव-क्षात्रभाव यामुळे दिवसभर वातावरणातील सात्विकता दिसून आली. नागपंचमीच्या दिवशी बहिणीची आर्त हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते, असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला साकडे घातले. अन् नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

डोणगाव नागनाथ मंदिराला यात्रेचे स्वरूप

डोणगाव येथे १९७८ साली लोकांना नागनाथ महाराजांनी लोकांना दर्शन देत स्वत: मंदिराची जागा दाखवली. सर्वांच्या सहकार्याने याठिकाणी नागनाथांचे मंदिर बांधण्यात आले. तेंव्हापासून भाविकभक्त याठिकाणी महाराजांना साकडे घालतात. महाराज देखील ते पूर्ण करतात असा अनुभव आल्यानंतर याला नवसाचा नागनाथ असे ओळखले जाऊ लागले. अमावस्येला व नागपंचमीला याठिकाणी यात्रेचे स्वरूप असते असे पुजारी मडिवळय्या हिरेमठ यांनी सांगितले.

मडकी वस्ती येथे प्रसाद वाटप

दरवर्षीप्रमाणे मडकी वस्ती येथे महामार्गावरील नागनाथ मंदिर भक्तांच्या वतीने महामार्गावर ये-जा करणाऱ्या भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी याठिकाणी होमहवन करून नागनाथांचे पूजन करण्यात आले. दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती.

Reactions

Post a Comment

0 Comments