पंढरपुरातील सर्व घाट बंद; तालुक्यातील आठ बंधारे पाण्याखाली
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणातून भीमा नदीत ७१ हजार ६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. तर, वीर धरणातून नीरा नदीमध्ये सकाळी दहापासून ३२ हजार ६६३ इतका विसर्ग सुरू आहे.
नीरेचे पाणी माळशिरस तालुक्यातील संगम येथून पुढे भीमा नदीत येते. त्यामुळे भीमेकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, पंढरपुरात चंद्रभागेने सायंकाळी इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
पंढरपुरात ४५ हजार क्युसेक इतक्या विसर्गाने चंद्रभागा प्रवाहित आहे. खबरदारी म्हणून चंद्रभागाचे सर्व घाट बंद करण्यात आले आहेत. मागील काही दिवासांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. उजनी धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे. सध्या धरणात ११५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरणात सुमारे ४४ हजार क्युसेकने आवक सुरू आहे. ऐनवेळी मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उजनी धरण व्यवस्थापनाने भीमानदीतून पाण्याचा विसर्ग वाढवून तो ७१ हजार ६६३ क्युसेक इतका केला आहे. तर, नीरेतूनही मोठ्या प्रमाणावर पाणी भीमेत येत आहे. त्यामुळे सध्या भीमानदी एक लाख १० हजाराहून अधिक क्युसेकने वाहू लागली आहे. दरम्यान, पंढरपुरात सायंकाळी चंद्रभागेने (४४३ मीटर) इशारा पातळी ओलांडली आहे. विसर्गामध्ये आणखी वाढ झाल्यास चंद्रभागा धोकापातळी गाठण्याची शक्यता आहे.
0 Comments