अनेक विद्यार्थ्यांकडे आधार असूनही निराधार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शाळेची पटसंख्या ही विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणानुसार ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे, जन्म तारखेत चूक, नाव, आडनावात चूक असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे आधार असूनही ते निराधार आहेत.
आधार कार्ड अपडेट न झाल्यामुळे शिक्षकांची नोकरी धोक्यात येईल, अशी संचमान्यता शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. त्यामुळे ज्यांचे या विषयाशी घेणे-देणे नाही, अशा शिक्षकांच्या नोकर्या धोक्यात आल्या आहेत. मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे. मात्र कुठे मुलांचे ठसे जुळत नाहीत, कुठे नावाचे स्पेलिंग चुकलेले असते, तर कुठे जन्म तारीख जुळत नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकही अडचणीत आले आहेत.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संकट येण्याची शक्यता आहे. आधार अपडेट करताना शिक्षकांना अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदत झाली पाहिजे, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
जन्मदाखलामध्ये चूक झाली असेल तर त्याप्रमाणे आधार कार्ड नोंदणी होते. जन्मदाखला शाळेत दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे संच मान्यतेत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होत नाही. त्यामुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
१५ हजार विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार नाह.जिल्ह्यात आधार अपडेट करण्याचे काम जवळपास ९७ टक्के पूर्ण झाले आहे.तसेच उर्वरित विद्यार्थ्यांचे विविध कारणांमुळे आधार कार्ड चुकीचे दाखवत आहे. तर १५ हजार ६६१ विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्डच नाही.त्यामुळे शिक्षकांची अडचण झाली आहे.
0 Comments