माझ्या नावाचा बोर्ड कचऱ्यात टाका, पण बोरामणी विमानतळ करा- सुशीलकुमार शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरांतर्गत असलेले होटगी रोड विमानतळ किती दिवस चालणार? सुरू झाल्यापासून एकदाही पूर्ण क्षमतेने प्रवासी उपलब्ध झाले नाहीत. शहराचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोरामणी विमानतळ होणे आवश्यक आहे.
सत्ताधाऱ्यांनी माझ्या नावाचा बोर्ड काढून टाकत तो कचऱ्यात टाकावा, परंतु बोरामणी विमानतळ विकसित करा, अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
हेरिटेज येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील एकाच व्यासपीठावर होते. शहर व जिल्ह्याच्या विकासावर ते बोलत होते.
यावेळी शिंदे पुढे म्हणाले, निवडणुकीत जो विजयी मिळेल असे वाटते, तो पाडला जातो. सोलापूरकरांनी मला सर्वसाधारण जागेवर दोनदा खासदार केले; मात्र राखीव जागेवर माझा पराभव झाला.
आम्ही प्रभावीपणे काम केले, लोकांनी ते स्वीकारले नाही. नाराज न होता काम केले पाहिजे, ते आम्ही करत आहोत. लोकशाहीत चिंतन केले पाहिजे. बोरामणी विमानतळासाठीची जागा जरी माझ्या कारकिर्दीत संपादित केली असली तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे नाव काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल; पण विमानतळ होणे महत्त्वाचे आहे.
बोरामणीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, यासाठी अनेक वर्षे मी प्रयत्न केले. मात्र काही लोकांचा हट्टी स्वभाव असतो की इथंच झालं पाहिजे. पण, इथं कसं? सोलापूर शहरांतर्गत असलेले होटगी रोड विमानतळ सध्या सुरू झाले आहे. पण, ते किती दिवस टिकणार आहे? आतापर्यंत पूर्ण क्षमतेने प्रवासी उपलब्ध झाले नाहीत. आम्ही म्हणतो की ठिक आहे, सत्ता त्यांची आहे. तेवढं तरी चालू द्या. पण तेही विमानतळ चालत नाही.
0 Comments