Hot Posts

6/recent/ticker-posts

अखेर ३ दिवसाआडचा पाणीपुरवठा पुन्हा ४ दिवसाआडच

 अखेर ३ दिवसाआडचा पाणीपुरवठा पुन्हा ४ दिवसाआडच


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शहरातील गावठाण भागात प्रायोगिक तत्त्वावर चार दिवसाआड ऐवजी तीन दिवसात करण्यात आलेला पाणीपुरवठा विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कारणावरून पुन्हा चार दिवसाआडच करण्यात आला आहे. हा पाणीपुरवठा एक रोटेशनसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाने दिली. यामुळे शहरातील गावठाण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असला तरी, यापुढे हा पाणीपुरवठा नियमित होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर दरम्यान १७० एमएलडी पाण्याची ११० किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

यानंतर मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकचे पाणी शहराला मिळत असल्याने गावठाण भागातील पाणीपुरवठा प्रायोगिक तत्त्वावर ४ दिवसाआड ऐवजी ३ दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावरील या पाणीपुरवठा संदर्भात आपले हात झटकले होते. महापालिका आयुक्तांनी तर शहरातील

अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारल्याशिवाय दिवस कमी करून पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. यानंतर अधिकऱ्यांमधील बेबनाव पुढे आला होता. शहरभर याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने मात्र पुन्हा प्रायोगिक तत्त्वावरील पाणीपुरवठया संदर्भात घोषणा करण्यात आली

होती. अवघ्या आठ दिवसातच या पाणीपुरवठयावर विविध कारणाने पुन्हा विरजण पडले आहे.


शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पाकणी जलशुध्दीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा बुधवार दि. ९ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळपर्यंत खंडित होणार आहे. त्यामुळे उजनी पंपगृह व पाकणी जलशुध्दीकरण केंद्र येथून पाण्याचा उपसा होऊ शकणार नाही. विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत महापालिकेकडून जुनी उजनी पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.


या कारणामुळे उजनी पाईप लाईनवरुन अवलंबून असलेल्या परिसराचा तीन दिवसआडचा पाणीपुरवठा दि. ९ जुलै पासून एक रोटेशन एक वेळ पुढे जाणार आहे. विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याने उजनी व पाकणी येथील पंप बंद राहणार आहे. नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments