Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरुपौर्णिमा उत्सवाची अक्कलकोट प्रशासनाकडून चोख तयारी

 गुरुपौर्णिमा उत्सवाची अक्कलकोट प्रशासनाकडून चोख तयारी

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा प्रशासनाने नियोजनबध्द आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज अशी तयारी सुरू केली आहे. भाविकांची अचूक गणना करण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारात चार ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसविण्यात येणार असून, नऊ ठिकाणी पार्किंग आणि तीन ठिकाणी मदत केंद्रांची ही स्थापना होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.


दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येणार असल्याचे गृहीत धरून प्रशासनाने डिजिटल यंत्राद्वारे गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या प्रगटदिनी फक्त एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने ७२ तासांत अडीच लाख भाविकांची नोंद झाली होती. यावेळी चारही मुख्य प्रवेशद्वारावर कॅमेरे लावण्यात येणार आहेत, ज्यामुळे गर्दीच्या व्यवस्थापनात अधिक अचूकता येणार आहे. याची माहिती वरिष्ठ स्तरावरील शासकीय यंत्रणांनाही देण्यात येणार आहे. ज्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना लवकर करता येतील. वाहतुकीस अडथळा न होता भाविकांना सोयीस्करपणे दर्शन घेता यावे, यासाठी नऊ ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये मंगरूळे हायस्कूलसमोरील मैदान, हत्ती तलाव परिसर, शेख नुरुद्दीन बाबा दर्गा पटांगण, मैंदर्गी रोडवरील स्मशानभूमी शेजारील जागा, स्वामी समर्थ हॉस्पिटल परिसर, कांदा बाजार, बसस्थानकाजवळील मल्लिकार्जुन मंदिर प्रांगण, हन्नूर रोडवरील त्रिकोणी जागा इत्यादींचा समावेश आहे.


उत्सव काळात भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून समाधी मठ, वटवृक्ष मंदिर परिसर आणि मंगरूळे हायस्कूल भागात पोलीस मदत केंद्र कार्यरत राहणार आहेत. गर्दीच्या वेळापत्रकात मार्गदर्शन, सुरक्षा व आरोग्य सेवा यासारख्या बाबतीत ही केंद्रे उपयोगी ठरणार आहेत. तांत्रिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि मदत केंद्रांच्या माध्यमातून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, श्रध्दा आणि भक्तीचा महामेळा आहे. त्यामुळे अक्कलकोट नगरीतील प्रशासनाने यंदाच्या उत्सवासाठी केलेल्या तयारी सोहळा अधिक सुरक्षित आणि भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.


श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव


गुरुवार, दि. १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्व असल्याने गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव येथे मोठ्या भक्ती भावाने संपन्न होणार असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.


गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु तथा गुरूंचा महिमा म्हणजे येथील वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. अशा या पावन गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, दोन ठिकाणी चप्पल स्टँड, विशेष दर्शन रांगेचे नियोजन, पाऊसापासून संरक्षणा करीता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्राशेड उभा करण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेदिवशी वटवृक्ष मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे ४ वाजता होईल. यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होईल. तत्पूर्वी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराचे महाद्वार रात्री २ वाजता उघडण्याचा व गर्दीच्या अनुषंगाने मंदिरात स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. महानैवेद्य आरती सकाळी १०:३० वाजता संपन्न होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी - गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. श्रींचा पालखी सोहळा रात्री ७ वाजता संपन्न होईल. यानंतर शेजारती संपन्न होईल, अशी माहिती समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.


चौकट 

समाधी मठ येथे कार्यक्रम

येथील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनंजय पुजारी यांनी दिली. गुरुवार, दि. १० जुलै रोजी पहाटे दोन वाजता 'श्री'ची काकडा आरती सोहळा होणार आहे. सकाळी सात वाजता स्वामी महाराज यांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराजांना दिलेल्या मूळपादुकांचे पूजन व श्री गुरु पाद्यपूजा सोहळा व अभिषेक अनुप महाराज व त्यांच्या पत्नी अदिती पुजारी यांच्या हस्ते होणार आहे. महाप्रसादाचा नैवेद्य सकाळी नऊ वाजता दाखविण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती होणार आहे. सायंकाळी पाच वाजता भजन संध्या, रात्री आठ वाजता श्रींची आरती व पालखी होणार आहे.


चौकट 

एकत्रित पाहणी अन् अंमलबजावणीला सुरुवात मागील आठवड्यात तहसीलदार विनायक मगर, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, नगरपरिषदेचे अधिकारी व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली होती. त्यानंतर अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अधिक शिस्तबध्द आणि भाविकांसाठी सुलभ होणार आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments