महाराष्ट्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चिमुकल्यांचे संगोपन, त्यांना अक्षर,अंक ओळख करून देऊन शिक्षणाची गोडी लावण्याचे प्रमुख काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना १० ते १५ हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये आणि मदतनीस महिलांना अवघे ७५ हजार रुपयेच मिळतात. कामाचे स्वरूप व कामाचा वेळ वाढूनही खूपच कमी मानधन असल्याची स्थिती आहे.
अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता, सेवानिवृत्तीनंतर दरमहा निश्चित रक्कम दिली जाईल, मानधन वाढ होईल, अशी अनेक आश्वासने मंत्र्यांकडून मिळाली. पण, त्याची पूर्तता झाली नाही. केंद्र सरकारने चिमुकल्यांच्या घरी जाऊन आहार वाटप करण्याचा फतवा काढला आणि आहार देताना पालकांचा फोटो काढायचा, तो फोटो अपलोड केल्यावर पालकांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या संकेतस्थळावर टाकण्याचे बंधन घालण्यात आले. त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या असून यात महाराष्ट्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
(बुधवारी) सांगलीत तर १५ जुलैला सोलापुरात मोर्चा काढला जाणार आहे. दररोज सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना (पाच वर्षे सेवा बंधनकारक) निवृत्तीनंतर अवघे एक लाख रुपये एकरकमी मिळतात. दुसरीकडे मदतनीस कर्मचाऱ्यांना ७५ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय आहे. त्या रकमेत वाढ करून पेन्शन सुरू करण्याची मागणी अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांची आहे.
विविध प्रश्नांवर आता राज्यभर आंदोलने,कामाच्या तुलनेत पुरेसे मानधन नाही, पेन्शनचा निर्णय नाही, सेवानिवृत्तीनंतर लाभ खूपच कमी, प्रोत्साहन भत्ता मिळत नाही, असे प्रश्न अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांचे आहेत. तरीदेखील, घरपोच आहार वाटप करताना पालकांचे फोटो व त्यांच्या मोबाईलवरील ओटीपी घेऊन शासनाला पाठविण्याचे नवे काम त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक सेविका राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर १५ जुलैला सोलापुरात आणि अन्य तारखांना राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.
- सूर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना
चौकट
अंगणवाडी सेविकांचे मानधन
दरमहा मानधन-१० ते १५ हजार रुपये,निवृत्तीनंतर सेविकांना मिळतात-१ लाख रुपये,निवृत्तीनंतर मदतनिसांना मिळतात-७५ हजार रुपये,एकरकमी लाभासाठी सेवेचे बंधन-५ लाख रुपये
0 Comments