नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना क्यू आर स्कॅनिंग कोड द्वारे सुविधा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ३० जून रोजी नातेपुते शहरात मुक्कामी आल्यानंतर नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्या बरोबर असणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना अत्यावश्यक सुविधेसाठी क्यू आर स्कॅनिंग कोड द्वारे सुविधा देण्याचा प्रयत्न केला असून अनेक दिंडीतील वारकरी मंडळींनी या क्यू आर स्कॅनिंग कोडचा लाभ घेतल्याचा दिसून आला असल्याची माहिती नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.क्यू आर कोड मुळे वारकऱ्यांना आपत्कालीन मदत केंद्र, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह, चेंजिंग रूम, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर भरण्याची सुविधा थकलेल्या वारकऱ्यांसाठी चरण सेवा या अनेक सुविधेचे वापर करण्यासाठी सहजरित्या याचा वारकऱ्यांना उपयोग झाला. पुढील वर्षी येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये अद्यावत जीपीएस आधारित क्यू आर स्कॅनिंग कोडची सुविधा यशस्वीरित्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पालखी तळावर मुक्कामाच्या ठिकाणी श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील पादुकाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक त्या ठिकाणी गर्दी करून असतात नगरपंचायतीच्या वतीने महिलांची व पुरुषांची वेगळी दर्शन रांग बनवून सुलभ व जलद दर्शन देण्याची सुविधा त्या ठिकाणी करण्यात आली होती व त्यासाठी महाराष्ट्र कमांडो रेस्क्यू फोर्सचे वीस कमांडो दर्शन रांगेत ठेवण्यात आले होते. पालखी तळ परिसरात विद्युत प्रवाह खंडित होऊ नये यासाठी संपूर्ण इलेक्ट्रिक सिटी जनरेटरवर ऑपरेट करण्यात आली होती. पालखीतळ व परिसर रस्त्यावर कोणतेही दुकाने लावू न दिल्यामुळे दर्शन रांगेला कोणताही अडथळा आला नाही. गर्दीमुळे मोबाईलवर रेंज अभावे संभाषण होत नसल्याकारणाने प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांबरोबर वॉकी टॉकी द्वारे संभाषण होत असल्याने तेथील कामे वेळेत मार्गी लागत होती. नगरपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांबरोबर नातेपुते व नातेपुते परिसरातील भाविक भक्तांना ही विविध सुविधा पुरवण्यात आले असल्याची माहिती नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली. नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने पालखी सोहळा हा आनंदीमय नियोजनबद्ध पार पडला.
0 Comments