श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील श्री विठ्ठल ज्ञानपीठ निमगांव (टें) संचलित, आनंदनगर-मानेगाव येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल- रुक्मिणीच्या वेशात मोठ्या भक्तिमय व आनंददायी वातावरणात 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणाचा जयघोष करीत खांद्यावर पालखी व भगवी पताका घेऊन काढलेल्या दिंडीने भाविक भक्त व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे व विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके व हभप तुकाराम कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व संस्थेच्या सचिव प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची हुबेहूब व आकर्षक आणि सुंदर वेशभूषा केली होती. वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन दिंडी भक्तिमय वातावरणात शाळा परिसर, आनंदनगर व मुख्य रस्त्यावरून पायी दिंडी काढताना मुले आनंदाने व भक्तीभावाने मंत्रमुग्ध झाली होती.शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अभंग व गवळणी सादर केल्या तेंव्हा 'माऊली-माऊली' नावाने परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.या दिंडीचे शेकडों विद्यार्थ्यांसह,ग्रामस्थ व पालकांनी दर्शन घेतले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके,तुकाराम कापसे, तनुजा तांबोळी,शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर,सुनील खोत, सुधीर टोणगे,लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
0 Comments