भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा- खा. प्रणिती शिंदे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- "भाजप महायुती सरकारचा स्मार्ट मीटर कायदा, अदानींचा फायदा"अशी घोषणा करीत जनतेच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्यांच्या विरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरलेच पाहिजे, असे प्रतिपादन खा प्रणिती शिंदे यांनी केले.
खा शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी व नजीक पिंपरी या गावांचा दौरा केला त्यावेळी त्या बोलत होत्या.
खा प्रणिती शिंदे यांनी भांबेवाडी व नजीक पिंपरी गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उजनीच्या पाण्याने नजीकपिंपरी तील तलाव भरून घेणे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाढविणे तसेच इतर अपूर्ण कामे, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार असल्याचे खा शिंदे यांनी यावेळी सांगीतले. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खा शिंदे म्हणाल्या ,ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असताना ही महावितरणकडून सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सक्तीचा आणि दडपशाहीचा वापर करून बेकायदेशीर पणे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. महावितरणचे कर्मचारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता घरोघरी स्मार्ट मीटर बसवुन जवळपास बारा हजार रुपये ग्राहकांकडून टप्प्याटप्प्याने वसूल करणार आहेत.
जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना केवळ अदानी व इतर खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेची लूट सुरु आहे. या प्रकारामुळे भाजप महायुती सरकारचा प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला आहे. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले आहेत, त्यांना पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढीव वीज बिल येत असून त्याची जबरदस्तीने वसुली सुरू आहे. त्यावर प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांना अधिकाऱ्यां कडून अरेरावीची वागणूक दिली जात आहे व वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
अदानी व इतर कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही. भाजप महायुती प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या या स्मार्ट मीटर योजनेला आमचा तीव्र विरोध आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घेऊ नये, त्याला ठाम विरोध करावा. जनता जागृत राहिली नाही, तर अशा कंपन्यां मार्फत सरकार आपलीच लूट करत राहणार आहे. या अन्याया विरोधात आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने या लुटी विरोधात रस्त्यावर उतरून लढाईसाठी सज्ज रहावे, असे आवाहनही खा शिंदे यांनी केले. या गावभेट दौऱ्यात तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार, माजी सरपंच केशव वाघचवरे, आदिसह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थीत होते.
0 Comments