शक्तिपीठ महामार्ग रद्द करा
शेतकऱ्यांची मागणी : मोहोळ मार्गावर रास्ता रोको
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):-
शक्तिपीठ महामार्गाची कोणतीही मागणी नसताना शासन जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या माथी तो महामार्ग मारत आहे. शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे. हा मार्ग शेतकऱ्यांच्या पोटावरून फिरविण्याचा घाट सरकारने घातला आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी संपादित करू नये, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी मोहोळ तालुका शक्तिपीठ शेतकरी
संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ- पंढरपूर पालखी मार्गावर मोहोळ येथे रास्ता रोको केला.
मंगळवारी (दि. १) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ-पंढरपूर पालखी महामार्गावर शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, अॅड. श्रीरंग लाळे, शाहूराजे देशमुख, दिनेश घागरे, संजय साठे, डॉ. बाबासाहेब पाटील, शिवाजी दळवे, ब्रह्मदेव भोसले, बाळासाहेब पवार, गणेश चव्हाण, सुभाष काळे, महेश देशमुख, अमर देशमुख, प्रथमेश गायकवाड, सिताराम देशमुख, गणेश डोकडे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते. आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरच्या
दिशेने मार्गस्थ होत आहेत. मोहोळ- पंढरपूर पालखी मार्गावरच रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनस्थळी मोहोळ पोलीस ठाण्याचा मोठा फौज फाटा होता.
चौकट १
कार्यवाही त्वरित थांबवावी
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या जमिनी जाणार आहेत. मागील ३०-४० वर्षांपासून वारंवार मागणी करूनही अनेक गावरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते, शेतरस्ते सरकार करू शकत नाही. परंतु कोणाचीही मागणी नसताना शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादत आहे. शक्तिपीठ
महामार्गाची कार्यवाही शासनाने त्वरित थांबवावी; अन्यथा त्या विरोधात तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
0 Comments