प्रवीण गायकवाड हल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंदची हाक
अक्कलकोट, (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या घटनेच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी, १८ जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली असून हा बंद दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत राहणार आहे. या बंदमध्ये सोलापूर जिल्हा तसेच शहरातील बहुजन चळवळीतील सर्व संघटना आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.
गेल्या रविवारी अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून व अंगावर वंगण टाकून भ्याड हल्ला करण्यात आला.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सभागृहात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माऊली पवार बोलत होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर संपूर्ण पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. या हल्ल्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावी, अशा पद्धतीने अक्कलकोट बंदचे नियोजन करण्यात येत आहे.
या बैठकीस सोलापूरमधील मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम बरडे, नाना काळे, राजन जाधव, राम गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, दुकाने व अन्य व्यवहार बंद राहणार असून, केवळ दवाखाने आणि मेडिकलसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि स्थानिक जनतेला अडचण होऊ नये म्हणून बंद फक्त दुपारी २ वाजेपर्यंत असला तरी तो पूर्णतः कडकडीत असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे राम गायकवाड म्हणाले, मुळात हा कार्यक्रम फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्यावतीने आयोजित करण्यात आला असताना काहीजण विनाकारण अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांची बदनामी करत आहेत. हे एक नियोजित षडयंत्र असून, आम्ही हे सहन करणार नाही. या षडयंत्रामागे नेमके कोण आहे, हे शोधून काढले जाईल. बाबा निंबाळकर यांनीही या प्रकरणात नाहक भोसले कुटुंबीयांची बदनामी केली जात असल्याचा ठपका ठेवत या कारस्थाना विरुद्ध निश्चित आवाज उठवला जाईल. हा बंद फक्त गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा नव्हे, तर या बदनामीचा निषेध म्हणूनही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकल मराठा समाज बहुजन चळवळ आणि श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था यांच्यावतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदला काही जणांनी तात्काळ पाठिंबा दर्शवला आहे. सर्वांनी पाठिंबा घोषित करावा,असे आवाहन फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या संचालक बाळासाहेब मोरे यांनी केले.
दरम्यान या अक्कलकोट बंदला सर्व स्तरातून जाहीर पाठिंबा मिळत असून काँग्रेस नेते अशपाक बळोरगी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी एजाज मुतवल्ली आणि शाकीर पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी अरुण जाधव, अतुल जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे, अॅड. सुरेशचंद्र सूर्यवंशी, मनोज निकम, अमर शिंदे, अभय खोबरे, शाम मोरे, लाला राठोड, दयानंद काजळे, तम्मा शेळके, प्रवीण घाडगे, शितल फुटाणे, वसंत देडे, वरूण शेळके, प्रवीण देशमुख, प्रसन्न हत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :-
बदनामीचे षडयंत्र
योद्धा शरण जात नाही म्हटल्यावर बदनामी केली जाते अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली. जेव्हा एखादा लढवय्या झुकत नाही, तेव्हा त्याला बदनाम करण्याचे डाव रचले जातात. आज जनमेजयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांच्यावर अशाच प्रकारचे षडयंत्र सुरू आहे. मात्र या प्रकरणाची खरी माहिती प्रवीण गायकवाड यांना देण्यात आलेली आहे त्यावर पडदा देखील पडलेला आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
चौकट :-
ज्या चौकात हल्ला केला, त्याच चौकात सन्मान करू !
गायकवाड यांच्यावर ज्या चौकात हल्ला झाला, त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून विचारांचा विजय साजरा केला जाईल, असेही माऊली पवार यांनी ठामपणे जाहीर केले. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे, असा संदेश देत त्यांनी हा हल्ला संपूर्ण बहुजन चळवळीवर आहे, असे सांगत एकतेचा निर्धार व्यक्त केला.
0 Comments