जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना कार्यालय बांधण्यासाठी निधी मंजूर - चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (कटूसत्य वृत्त):- पंचायती राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान या योजनेचे पुनर्गठन करुन पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा घटकांतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि नागरी सुविधा केंद्र खोली बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतीना निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
ग्रामपंचायतींकरीता नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली या उद्दिष्टाच्या अधीन राहून ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३००० पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही, अथवा धोकादायक व मोडकळीस आलेली आहे अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिल्या होत्या.
संचालक, पंचायत राज यांनी वरील निकषानुसार ग्रामपंचायतींची यादी मागविली होती. वार्षिक कृती आराखड्यानुसार ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३००० पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही अथवा असलेली इमारत धोकादायक व मोडकळीस आलेली आहे, अशा नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामास पायाभूत सुविधा घटकांतर्गत मान्यता दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी, करमाळा तालुक्यातील घोटी, झरे, पोथरे, माढा तालुक्यातील बेंबळे, अरण, सांगोला तालुक्यातील आलेगांव, पाचेगाव बु., वासुद, घेरडी, जुनोनी या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
0 Comments