राष्ट्रवादीच्या मेळाव्याला हजेरी लावत राजन पाटलांनी साधला राजकीय डाव!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूरमध्ये प्रथमच पक्षाचे जाहीर कार्यक्रम झाले. शहर आणि जिल्हा (ग्रामीण) असे दोन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले.
मात्र, या दोन मेळाव्यातून राष्ट्रवादीमधील गटबाजीचे उघड दर्शन झाले. माजी आमदार राजन पाटील गटाने शहराच्या मेळाव्याला हजेरी लावत जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना विरोध कायम असल्याचे दाखवले. विशेष म्हणजे याच व्यासपीठावरून शहराध्यक्षांनी उमेश पाटलांची प्रदेशाध्यांकडे तक्रार केली आणि तटकरेंनी त्याची दखलही घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्या फळीतील नेता सोमवारी (ता. 22 जुलै) प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर आला होता. त्यातही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच येत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजींवर जालीम उपाय सुचवतील, अशी अपेक्षा होती. पण, दोन्ही गटातील नेत्यांसारखे बोलत तटकरे यांनी पक्षातील गटबाजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. शहराच्या मेळाव्याला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माजी आमदार संजय शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात शहराध्यक्ष संतोष पवार यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेतला जिल्हाध्यक्ष शहराच्या कामात ढवळाढवळ करीत आहेत. महापालिका निवडणुकीत तिकिट देण्याचा शब्द देत आहेत. तसेच, शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही ते प्रदेशपातळीवरून करून आणत आहेत, अशी तक्रार पवार यांनी तटकरे यांच्याकडे केली.
तटकरेंनी संतोष पवारांना तुम्ही जी खंत व्यक्त केली आहे, त्याची योग्य दखल मी घेतली आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला विश्वासात घेऊनच महापालिका निवडणुकीत तिकिट वाटप होईल, असा शब्द दिला. तसेच शहराच्या मेळाव्याला उपस्थित असलेले राजन पाटलांना सोलापूरचे मालक म्हणत पक्षात तुम्हाला पूर्वीचा मानसन्मान मिळेल, असेही स्पष्ट केले.
उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. पण विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे पाटील यांना जिल्हाध्यक्ष केल्याने राजन पाटील ग्रुप नाराज आहे. मात्र, ती नाराजी जाहीरपणे न दर्शविता त्यांनी शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या पाठीशी उभे राहत त्या माध्यमातून उमेश पाटील विरोध कायम ठेवला आहे.
राजन पाटील, यशवंत माने यांनी ग्रामीणच्या मेळाव्याला दांडी मारत आपल्या मनातील खंत कायम असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दाखवून दिले आहे. पण उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आपण तयार नसल्याचे राजन पाटील गटाने पुन्हा दाखवून दिले आहे. त्यामुळे निवडणुकीत यश मिळविण्याची व्यासपीठावरून नुसतीच भाषणबाजी झाली. मात्र, त्यासाठी एकीने लढायची तयारीही राष्ट्रवादीचे नेते दाखवत नसल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीणच्या मेळाव्यात आपल्याच खुर्चीवर बसलेल्या उमेश पाटील यांना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जाहीररित्या कानपिचक्या देताना 'मान रखो कभी कभी' असे सुनावले. मात्र उमेश पाटील यांच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुकही केले. तसेच, माजी आमदार संजय शिंदे यांना पक्षात सक्रीय होण्याचाही सल्ला दिला.
0 Comments