रे नगर गृहनिर्माण लाभार्थ्यांचे गृहकर्ज व संस्थेच्या थकित देय रकमा तातडीने अदा करण्याचे आवाहन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात ऐंशी नव्वद च्या दशकात श्रमिक कष्टकरी अत्यंत दाटीवाटीने राहत असत. त्यांना पिढ्यान् पिढ्या भाड्याच्या घरात राहत असत त्यांना मायबाप सरकार कडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रचंड मोठी लढाई करून श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या पुढाकाराने संघर्षाच्या माध्यमातून जवळ जवळ ४५ हजाराहून अधिक घरकुल मिळवून दिले. मा. केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत गृहकर्ज मिळवून दिले. हे कर्ज देत असताना लाभार्थ्यांवर पात्र जमीनदारांची अट शिथिल करून जामीनदाराशिवाय अत्यल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले. या गृहकर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने संस्थेला थकित देय रकमा तातडीने अदा करण्यासंबंधी पत्र पाठवून दिले. वास्तविक पाहता वसाहतीची जागा हि शेत जमीन असून रे नगरच्या लाभार्थ्यांकरिता पिवळा पट्टा अर्थातच रहिवाशी झोन घोषित केले. रे नगर गृहनिर्माण प्रकल्प हे देशाच्या इतिहासात महत्वाकांक्षी व पथदर्शी म्हणून नोंद आहे. म्हणून ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत बँकेतील गृहकर्ज हप्ते व संस्थेची थकित देय रकमा अदा करून घरकुलांचा ताबा घ्यावे असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
गुरुवार दिनांक १२ जून रोजी रे नगर फेडरेशन संलग्न सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्जाचे थकीत हप्ते व संस्थेची थकीत देय रकमा तातडीने अदा करण्या संबंधी संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत रे नगर गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्ज व संस्थेच्या थकित देय रकमा तातडीने अदा करण्यासंबंधी संचालक मंडळात एक मताने निर्णय घेण्यात आला व त्या अनुषंगाने वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देण्याचे निर्णय घेण्यात आले.
आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत रे नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी फेडरेशनमार्फत मौजे कुंभारी (ता. द. सोलापूर) येथे ३०,००० असंघटीत कामगारांसाठी परवडणाऱ्या दरात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरकुलांचा लोकार्पण सोहळा दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. सद्यस्थितीत फक्त ३,१५० लाभार्थ्यांनी संपूर्ण रक्कम भरून घरांचा ताबा घेतलेला असून ११,८७४ लाभार्थ्यांनी अद्याप ताबा घेतलेला नाही. या लाभार्थ्यांकडून बँक किंवा संस्थेकडे थकीत रक्कम भरायची आहे. दि.०६ मे २०२५ रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रामध्ये उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने थकीत रक्कम भरून ताबा घ्यावा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. फेडरेशनने तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली असली, तरी शासनाकडून अद्याप निर्णय आलेला नाही.
फेडरेशनने सर्व संबंधित लाभार्थ्यांना तातडीने बँक व संस्थेची थकीत रक्कम भरून घराचा ताबा घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा केंद्र व राज्य शासनामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी मंचावर मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम (मास्तर) , रे नगर को. ऑफरेटीव्ह हाउसिंग सोसायटीज फेडरेशन चे अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी व सचिव युसुफ शेख (मेजर) व फेडरेशन संलग्न हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी सचिव मुमताज शेख, कॉ.मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी,विजयालक्ष्मी महेशन, कॉ.एम. के. पंधे. यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी सचिव शंकर गड्डम, श्री स्वामी समर्थ विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कॉ मुरलीधर सुंचू, सचिव लता सारंगी, जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुरमय्या म्हेत्रे, सचिव लक्ष्मण भंडारे, हुतात्मा रेडीमेड व शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संदीप रेऊरे सचिव विरेंद्र पद्मा, स्वातंत्र्यसैनिक कॉ नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मनिषा ओंकार, संस्थेचे विधी सल्लागार ॲड अनिल वासम, वसंत विहार रियालिटी प्रा. लि.चे डी.एल. पवार, सिद्धराम महिंद्रकर, मंदार अंत्रोळीकर, संतोष पाटील, मुख्य व्यवस्थापक गजेंद्र दंडी सर्व संचालक मंडळ आदींची उपस्थिती होती.
0 Comments