क्रीडा प्रबोधीनीत सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश प्रक्रिया
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य प्रवेशाकरिता विभागस्तर व राज्यस्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23 जून 2025 रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा सुविधा, शिक्षण, भोजन, निवास इत्यादी सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांमध्ये निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी ज्युदो, जिम्नॅस्टिक, सायकलिंग, फुटबॉल,जलतरण, हॅन्डबॉल इत्यादी खेळांच्या खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी याबाबत अर्हता पुढीलप्रमाणे-
सरळ प्रवेश प्रक्रिया- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
वैद्यकीय चाचणी- या चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारिरिक दृष्ट्या खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.
सहभागासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड मोबाईल क्रमांक- 7219155252 यांच्याशी संपर्क साधावा. तरी इच्छुक खेळाडूंनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
0 Comments