जनसेवा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील अत्यंत बलवान व कर्तुत्ववान असणारे डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच एकमताने निवड करण्यात आली असून, लाखो कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतापगड अकलूज येथे संपन्न झालेल्या राज्य पदाधिकारी यांच्या बैठकीत डॉ.धवलसिंह मोहिते पाटील हे प्रदेश अध्यक्षपदी विराजमान व्हावेत म्हणून कार्यकर्त्या मधून मागणीने जोर वाढला होता.यावेळी मावळते प्रदेशअध्यक्ष माणिक मिसाळ यांनीच प्रदेश अध्यक्षपदी डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडताच, टाळ्यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी त्यास अनुमोदन दिले.
जनसेवा संघटनेची स्थापना स्व.शंकरराव मोहिते पाटील यांनी १९७५ साली केल्यानंतर १९९८ मध्ये स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी, या संघटनेचे महाराष्ट्र जनसेवा संघटना असे नाम विस्तारीकरण करून, जनसेवा संघटनेचे जाळे जवळपास राज्यातील २६ तालुक्यात पसरवले.
डॉ.धवलसिंह यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, गेल्या महिन्यात पुन्हा संघटनेचे मुख्यालय असणाऱ्या प्रतापगड येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, संघटनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा बळ देण्याचे सूतोवाच केले.तेंव्हापासून या संघटनेत आलेली मरगळ जाऊन कार्यकर्ते उत्साही झाले.
याच दरम्यान संघटनेच्या राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या फेरनिवडी झाल्या.प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण स्तरावर पदाधिकाऱ्यांची बांधणी केली आहे.त्यानंतर रविवारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची प्रतापगड येथे बैठक होऊन संघटनेच्या कामाला आणखी वेग येण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी डॉ.धवलसिंह यांनीच संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी अशी कार्यकर्त्यातून मागणी वाढू लागली होती.
या पार्श्वभूमीवर मावळते अध्यक्ष माणिक मिसाळ यांनी स्वतः च नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन दिले.
चौकट
जनसेवा कार्यकर्त्यांना सर्वतोपरी बळ देणार
अपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळाली पाहिजे म्हणून सहकार महर्षिनी या संघटनेची स्थापना केली असली तरी स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी या संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवून संघटनेचा विस्तार केला.त्यांनी कार्यकर्त्यांना राजकीय बळ दिल्याने अनेक कार्यकर्ते आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष,सदस्य,पंचायत समिती सभापती,सदस्य या पदावर गेले.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण ही कार्यकर्त्यांना राजकीय बळ देणार आहे.
डॉ.धवलसिंह मोहिते पाटील
0 Comments