सोलापुरात पुन्हा पावसाची हजेरी; अक्कलकोटचे कुरनूर धरण भरले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 16, 2025

सोलापुरात पुन्हा पावसाची हजेरी; अक्कलकोटचे कुरनूर धरण भरले

 सोलापुरात पुन्हा पावसाची हजेरी; अक्कलकोटचे कुरनूर धरण भरले




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या मे महिन्यात झालेल्या प्रचंड पावसानंतर चालू जून महिन्यात सुरुवातीच्या मृग नक्षत्रामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु नंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने तोंड वर काढले आहे.

या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अरळी गावचा पूल वाहून गेला आहे. तर बोरी नदीवरील कुरनूर धरण पूर्णतः भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

अक्कलकोट तालुक्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अरळी गावचा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या गावचा आसपासच्या परिसराशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, या गावात पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. हा प्रश्न यंदाच्या पावसात पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अर्धवट स्वरूपात राहिलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना तेथेच ठिय्या मांडून आंदोलन केले.

अरळी गाव अक्कलकोट व तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर आहे. तुळजापूर, नळदुर्ग परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अरळी गावच्या शिवारात पाणी घुसले आहे. तेथील तुलनेने कमी उंचीच्या पुलावर पाणी वाहून जात असताना पाण्याचा जोर वाढला आणि पूल वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, इटकळ, खानापूर, केशेगाव, बाभळगाव, सराटी तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी व अन्य गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.

अरळी गावचा पूल गेल्या वर्षी पावसामुळे मोडकळीस आला होता. पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थ गेले वर्षभर जीव मुठीत घेऊन या पुलावरून ये-जा करीत होते. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे या गावातील जीर्ण स्वरूपातील पुलाचे शिल्लक अवशेषही वाहून गेले आहेत. अरळी-सोलापूर रस्त्यावर असलेल्या या पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी अरळी गावचे सरपंच अजय सकट यांनी केली असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांसह सरपंच सकट यांनी मोडक्या पुलाजवळ वाहत्या पाण्यात बसून आंदोलन केले.

दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडून बोरी नदीत ४५० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. या धरणाची क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट एवढी आहे. या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे खालील भागातील आठ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरले जात आहेत. या बंधाऱ्यांच्या परिसरातील विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. दरम्यान, कुरनूर धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणातून बोरी नदीत पाणी सोडले जात असताना जलसंपदा विभागाचे सोलापूर विभागाचे उपअभियंता रोहित मलनूर यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली. एकंदरीत, कुरकूर धरण भरल्याने अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोटसह दुधनी आणि मैंदर्गी या तीन नगरपालिका तसेच काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात सरासरी २१.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माळशिरस, सांगोला, मोहोळ आदी भागात पडलेल्या पावसाची जिल्हा प्रशासनाकडे नोंद झाली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages