सोलापूरच्या सिध्देश्वर तलावातील ५५ कासवे मृत्युमुखी
वन विभागाकडून अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर तलावातील जलप्रदूषण वरचेवर वाढत असताना आता याच तलावात एकाच वेळी ५५ कासवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गेल्या आठवड्यात या तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. तलावाचे पर्यावरण राखण्यासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे एकाच वेळी ५५ कासवांचा मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. राज्यात प्रथमच एकाचवेळी ५५ कासवांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना समजली जात असून ही बाब जैवविविधता संवर्धन आणि संरक्षण कायद्यानुसार गंभीर मानली जाते. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे पर्यावरण व पशुपक्षिप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
गेल्या आठवड्यात या तलावात एकाच वेळी हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. वाढते जलप्रदूषण आणि कमी झालेल्या प्राणवायुमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचे बोलले जात असताना त्यावर सिध्देश्वर देवस्थान समिती किंवा प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यातच आता या तलावात एकाचवेळी ५५ कासवे मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. सर्व मृत कासवे सडलेल्या अवस्थेत आढळून आली. शवविच्छेदन झाल्यानंतर सर्व मृत कासवांचे विजापूर रस्त्यावरील सिध्देश्वर वन विहारात दहन करण्यात आले. यात चार कासव विदेशी प्रजातींची होती. 'अमेरिकेन रेड इयर स्लाइडर' या नावाचे हे कासव नागरिकही पाळतात. त्यापैकी कोणी तरी नागरिकांनी हे कासव सिध्देश्वर तलावात आणून सोडले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उर्वरित सर्व कासवे चिखल जातीची आहेत. त्यांना इंग्रजीत 'एशियाटिक फ्लॅपशेल टर्टल' या नावाने ओळखले जाते. हे कासव चिखलातही तोंडावाटे प्राणवायू घेऊन जगू शकते.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हे कासव उभयचर असून चिखलात, दूषित पाण्यात, पाण्याबाहेर आणि जमिनीवरही प्राणवायू घेऊन जगू शकतात. परंतु मागील आठवड्यात तलावात मृत्युमुखी पडलेले, कुजलेले आणि सडलेले मासे खाल्ल्याने विषबाधेतून कासवांना मरण आले असावे, असा प्राथमिक कयास व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ पक्षी आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अरविंद कुंभार यांनी या शक्यतेला पुष्टी दिली आहे. तलावात पुरेसा प्राणवायू आणि अन्नही मिळत नसल्यामुळे तसेच विषबाधित मासे सेवन केल्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा, असा अभिप्राय डॉ. कुंभार यांनी वर्तविला आहे. मात्र अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातूनच काढता येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सिध्देश्वर तलावात एकाचवेळी ५५ कासवे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची दखल घेऊन वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय वन विभागाने तीन सदस्यीय चौकशी समितीही गठित केली आहे. या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कासवांचे शवविच्छेदन
दरम्यान, सिद्धेश्वर तलावात मृत्युमुखी पडलेल्या ५५ पैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच कासवांचे शवविच्छेदन शासकीय पशुचिकित्सा रुग्णालयात करण्यात आले. मात्र कासवांच्या मृत्यूचे निश्चित कारण लगेचच देण्यात आले नाही. मृत कासवांच्या शरीरातील काही विशिष्ट नमुने (व्हिसेरा) काढून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तथापि, तलावातील दूषित पाणी हे कासवांच्या मृत्यूचे कारण असू शकते, असा प्राथमिक अभिप्राय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
0 Comments