चाचणी यशस्वी समांतर जलवाहिनीचा पहिला पंप सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ११० किलोमीटर उजनी-
सोलापूर समांतर जलवाहिनीची सोमवारी चाचणी घेण्यात आली.दुपारी दोन वाजता पंपगृहातील
११५० अश्वशक्तीचा एक पंप चालू करण्यात आला. महापालिका आयुक्तांच्या हस्ते कळ दाबून
चाचणीचा प्रारंभ केला. चाचणी यशस्वी झाली असून, बीपीटीजवळ २५ किलोमीटरचा प्रवास करून पाणी येण्यास २४ तास लागणार आहेत. पाकणी पंपगृहाजवळ पाणी येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे.सोलापूर पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनी ही योजना साकारली आहे.११० किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. या पाईप लाईनमधून शहराला १७० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. अनेक अडचणींवर मात करून ही योजना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारली आहे. यासाठी शहराला शाश्वत उजनी धरणावर नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविले आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजता ११५० अश्वशक्तीचा पहिला पंप चालू केला. एका पंपाद्वारे सोलापूरपर्यंत किती वेळेत किती पाणी पोहोचणार आहे,याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पंप सुरू करण्यात आले. पाकणी आणि सोरेगाव पंपगृहाजवळ पाणी येण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे.उजनी येथेली पंप हाऊस, उजनी दुहेरी पाईपलाईन, पंपिंग मशिनरी,जॅकवेलची, बी. पी. टी इत्यादी ठिकाणांची पाहणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रंगाराव, सिद्धेश्वर उस्तुर्गे, नितीन अंबिगार, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील,प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहायक अभियंता उमर बागवान, चेतन भोसले उपस्थित होते.
0 Comments