नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या सहाजणांची सुटका; पंढरपुरात तीन नागरिकांना बचावले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या सहाजणांची सुटका; पंढरपुरात तीन नागरिकांना बचावले

 नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या सहाजणांची सुटका; पंढरपुरात तीन नागरिकांना बचावले





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात नीरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात सहा नागरिक अडकले होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकडीने धाव घेऊन बाधित नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले.

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधूही गावात पूर आल्याने मंदिरात अडकले होते. त्यांचीही सुटका करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक पोहोचले आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.माळशिरस तालुक्यातील कुरबावी नीरा नदीच्या पुरात अडकलेल्यांमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश होता. इंदापूर-भिगवण परिसरात पहाटे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी आली होती. या तुकडीला कुरबावी येथील नीरा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या सहाजणांना वाचविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार ही तुकडी पहाटे तेथे पोहोचली. थोड्याच वेळात सर्व नागरिकांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, या गावातील ३० व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पाणी वाढल्याने मंदिरात अडकून पडले होते. त्याची माहिती गावच्या सरपंचांना मिळताच बचाव कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार बचाव कार्य करण्यात आले. यावेळी मंदिरातील एका कुत्र्यालाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.भीमा खोरे तथा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला होत आहे. अवघ्या सहा दिवसांत धरणात सुमारे आठ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

२१ मे रोजी धरणातील पाणीसाठा वजा पातळीत २२.९६ टक्के एवढा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता वजा ७.७२ टक्के पाणीसाठा झाला.‌ म्हणजे यातून सुमारे आठ टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे दिसून आले. सध्या धरणात दौड येथून १८ हजार ५०६ क्युसेक विसर्गाने पाणी मिसळत आहे. यानिमित्ताने मे महिन्यातील प्रखर उन्हाळ्यात प्रथमच उजनी धरण भरू लागले आहे. भीमा आणि नीरा नदीत पाणी वाढल्याने नदीकाठचे बंधारे पाण्याखाली जात आहेत. पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात पाणी वाढल्याने तेथील तेथील बंधा-यांसह जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages