कोट्यावधींच्या 'जीएसटी'घोटाळ्यातील सुत्रधार कोण?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरात जीएसटी बुडवण्याची प्रकरणे वारंवार समोर येत असून या वाढत्या प्रकारांमुळे जीएसटी बुडवण्याचे रॅकेट सोलापूरात कार्यरत आहेत का?अशी शंका घ्यायला जागा आहे. सोलापूर येथील वकील साजिद शेख याने बिनमालाच्या पावत्या देऊन जीएसटीचा सुमारे १०० कोटी रुपयांचा घोळ केल्याचे केंद्रीय जीएसटी पथकाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. साजिदच्या ३० कंपन्यांपैकी १२ कंपन्यांचा तपास पूर्ण झाला असून त्यापैकी आठ कंपन्यांची कार्यालये जागेवर नसल्याचे दिसून आले आहे.
त्या कंपन्यांची मालकी स्क्रॅपवाले, टेम्पो ड्रायव्हर, किरकोळ मेडिकल चालकांच्या नावे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तो लोखंडी सळई व सिमेंट विक्रीवरील जीएसटीच्या पावत्या बिलाची मागणी करणाऱ्यांना देत होता.
तीन वर्षांत ४०० कोटींपेक्षा अधिक व्यवहार होणाऱ्या सोलापूर शहरातील ३० कंपन्या केंद्रीय जीएसटी पथकाच्या नजरेत आल्या. अधिकाऱ्यांनी सोलापुरात येऊन त्यासंदर्भातील प्राथमिक माहिती घेतली. त्यांनी त्या कंपन्यांचे पत्ते घेऊन त्याठिकाणी भेटी दिल्या. त्यावेळी काही कंपन्यांच्या पत्त्यावर घरे होती तर काही ठिकाणी दुसरीच दुकाने थाटलेली होती. अनेकांची स्क्रॅपची किरकोळ दुकाने होती, त्यांचा वार्षिक व्यवसाय काही लाखात असेल, पण त्यांचा वार्षिक व्यवसाय कोट्यवधी दाखविण्यात आला होता. १२ कंपन्यांच्या मालकांना साजिद काही प्रमाणात दरमहा टक्केवारीच्या स्वरूपात पैसे देत होता आणि त्यांच्या नावे कंपन्या चालवायचा, अशीही बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतील साजिदकडे न्यायालयाच्या परवानगीने केंद्रीय जीएसटी पथकातील अधिकारी सखोल चौकशी करणार आहेत. त्यानंतर उर्वरित १८ कंपन्यांच्या मालकांची चौकशी सुरू होईल. साजिदने ३० कंपन्यांच्या माध्यमातून लोकांना दिलेल्या जीएसटीच्या पावत्यांची रक्कम १०० कोटींहून अधिक असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या रकमेतून तो स्वत:चे क्रेडिट तयार करून त्यातील काही रक्कम स्वत:साठी वापरत होता, असेही सांगण्यात आले.
साजिद शेख याने ३० कंपन्या सुरू करून त्याद्वारे ज्यांना पावत्या दिल्या, त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. साहित्य घेतले नसताना पावत्या कोणत्या कारणासाठी घेतल्या, याचे उत्तर त्या लोकांना जीसटीच्या केंद्रीय पथकासमोर द्यावे लागणार आहे. मागील तीन वर्षांत साजिद शेख याच्याकडून पावत्या घेणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. त्याची माहिती केंद्रीय जीएसटी पथकाने संकलित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.जीएसटी प्रक्रीयेतील त्रुटींचा फायदा घेऊन असे प्रकार होत आहेत का?यात आणखी कोणी सामील आहेत का?याचा शोध यंत्रणेने घेण्याची गरज आहे.काही महिन्यांपुर्वी सोलापूरात १०कोटी८५लाख रूपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी लक्ष्मीकांत लड्डा आणी श्रीकांत लड्डा या दोन व्यापारी बंधूंना अटक झाली होती.यामुळे जीएसटी बुडवण्याची यंत्रणा सोलापूरात कार्यरत आहे का याचा शोध यंत्रणेने घेण्याची गरज आहे.
0 Comments