कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणारे कृषीमंत्री कोकाटेंवर
रोहित पवारांची जहरी टीका;
बारामती (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केला जात आहे. यादरम्यान कोकाटे यांनी
कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. कोकाटे यांचा शेतकऱ्यांबरोबरच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कोकाटे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. याबरोबरच कोकाटेंवर जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला "कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजच नाही," अशी बोचरी टीका रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये केली आहे. "रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून..." असा इशाराही रोहित पवारांनी कोकाटे यांना दिला आहे.
0 Comments