Hot Posts

6/recent/ticker-posts

भंगार गाड्यांमधून प्रवासी वाहतूक ,महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

 भंगार गाड्यांमधून प्रवासी वाहतूक ,महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्वसामान्यांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी नागरिकांच्या जीवावर उठली आहे. अनेक बसेसचे पत्रे, दरवाजे व खिडक्यांचे पत्रे पारदार सुरीसारखे बाहेर निघाले आहेत. एसटीचे पत्रे निखळल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

 दिवसेंदिवस वाढलेले एसटीचे अपघात आणि अर्ध्या रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अजून किती दिवस अशाच नादुरुस्त बसेसने प्रवाशांना प्रवास करावा लागणार? असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. सोलापूर विभागातील नऊ आगाराला काही नवीन बसेस मिळाल्या आहेत, परंतु त्या बसेस पुरेशा नसल्याने आजही अनेक भंगार गाड्या रस्त्यावर धावत आहेत.  लालपरीचा प्रवास सुरक्षित असल्यामुळे प्रवासी तिच्यानेच प्रवास करतो आणि एसटीवर विश्वास ठेवतो. मात्र, वारंवार होणाऱ्या एसटीच्या ब्रेकडाऊनमुळे प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नऊ आगारांत अनेक बसेस
नागरिकांच्या सेवेसाठी आहेत, परंतु ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस या अर्ध्या रस्त्यातच बंद पडत आहेत. एवढेच काय, तर लांब पल्यासाठी धावणाऱ्या भंगार बसेस अर्ध्या रस्त्यातच दम तोडत असल्याच्या घटनाहीसमोर येत आहेत. सोलापूर विभागीय कार्यालय येथे दररोज दुरुस्ती केल्या जातात. परंतु या दुरुस्त बसेस सकाळी नियोजित ठिकाणी निघताच जर बंद पडत असतील, तर हा विषय अतिशय गंभीर आहे. याकडे महामंडळाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोलापूर आगारासह अन्य आगारात भंगार बसेसचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास
सहन करावा लागत आहे.

प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. भंगार बसेस तातडीने बदलून देण्यात याव्यात, अशी मागणी होत असताना अनेक भंगार बसेस अजूनही रस्त्यावर पावताना बघायला मिळत आहेत. अचानक बंद पडलेल्या बसेसच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर आगारात नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

महामंडळाने नागरिकांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत, ज्यात महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटात सवलत, तर ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास आहे, तर दिव्यांग प्रवाशांनाही प्रवासात सवलत देण्यात येत आहेत. सवलतीत प्रवास उपलब्ध आहे. परंतु सोयी सुविधा म्हणाव्या तशा उपलब्ध नाहीत.

एस.टी. महामंडळाच्या अनेक बसेस या भंगार अवस्थेत तसेच पत्रे तुटलेले, दरवाजे तुटलेले, खिडक्या निखळलेल्या असल्याने नव्या बसेस मागवण्याची गरज आहे. याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना भंगार बसेस मध्येच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
उन्हाळी हंगाम लक्षात घेता फिरायला व परगावला जाण्यासाठी प्रवाशांची एसटी स्टँडवर गर्दी वाढत आहे. अशा अवस्थेत एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सोयी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता. स्क्रैप आणि मोडकळीस आलेल्या बसेस देखील रस्त्यावर धावत आहेत. सदरच्या बसेस ताबडतोब बंद कराव्यात. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करू नये, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments