निम्म्या सोलापूर शहराला पाणीटंचाईच्या झळा, भिषण परिस्थिती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील निम्मे शहर प्रामुख्याने हद्दवाढ भागाला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आठवड्यातून एकदाच पाणी येते. त्या दिवाशी कोणाकडे मोटारीमुळे धबाधबा पाणी तर कुठे नुसतेच पाण्याची धार लागते.
अशातच नोकरी, लग्नकार्य, दवाखाना, वीज गायब अशा काही कारणास्वत पाण्याचा एक वार हुकलाच तर मग पंधरा दिवसांनीच पाणी मिळते. पाण्याची भटकंती ही सोलापूरकरांसाठी नित्याचीच बाब बनली आहे. एकीकडे उष्माघात आणि दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाने सोलापूरकर होरपळून चालले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोलापूरची तहान भागविण्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी फेल ठरल्याचे दिसून येत आहे.
पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. हद्दवाढमध्ये तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावे या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत चार तास बैठक घेतली. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शटडाऊन, फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीसाठी म्हणून शहरातील पाणीपुरवठा चार वरून पाच दिवसाआड करण्यात आले. शहराला पाच दिवसाआड पाणी म्हणजे प्रत्यक्षात सात दिवसानंतर पाणी मिळते.
म्हणजेच आठवड्यातून एकदा पाणी उपलब्ध होत आहे. शहरात मध्यमवर्गीय नोकरदार आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नोकरीसह इतर काही कारणास्तव एखादा पाण्याचा वार हुकलाच तर मग पंधरा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली आहे.
४४ कोटीच्या फ्लोमीटरचा उपयोग नाहीच
टाकीतून जाणारे व जलवाहिनीतील वितरित होणाऱ्या पाण्याची मोजमाप करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ४४ कोटी रुपये खर्चून ३८२ फ्लोमीटर बसविण्यात आले. शहरातील ६१ पाणी टाक्यांवर इन व आऊट असे प्रत्येकी दोन फ्लोमीटर तर उर्वरित मुख्य जलवाहिनीवर बसविण्यात आले. एखाद्या भागात अस्तित्वात असलेली लोकवसाहत, तेथील पाण्याची गरज, सोडण्यात येणारे पाणी, संबंधित भागाच्या शेवटच्या टोाकपर्यंत पाणी पोहचते की नाही? हे ॲटोमॅटीक मेसेजद्वारे समजेल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात याचा फ्लोमीटरचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येते.
२५० पेक्षा अधिक नगरातील नागरिकांची भटकंती
तुळजापूर फूट रोडलगत दोन्ही बाजूची वसाहत, शेळगी, हैदराबाद रोड, विडी घरकूल, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, प्रगती नगर, अक्कलकोट रोड व एमआयडीसी परिसर, निलम नगर, जुना कुंभारी रोड, विमानतळपाठीमागे शांती नगर, नई जिंदगी, स्वागत नगर, साखर कारखाना परिसर, शंकर नगर, हराळे वस्ती, टिकेकरवाडी, कुमठा, सोरेगाव, एसआरपी कॅम्प, उध्दव नगर, प्रल्हाद नगर, माशाळ वस्ती, संतोष नगर, देगाव राजस्व नगर, बसवेश्वर नगर, देगाव परिसर, अवंती नगर आणि जुळे सोलापूरचा काही भाग आदी शहरातील साधारण २५० पेक्षा अधिक नगरांमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे.
0 Comments