कोण कोणाबरोबर जाणार याबाबत प्रचंड उत्सुकता
सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अर्ज मागे घेण्यासाठी फक्त सहा दिवस बाकी आहेत. तरीही कोण कोणत्या गटासोबत जाणार हेच ठरत नसल्याने उमेदवारांसह कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना याबाबत उत्सुकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल साडेचारशे पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील ३८८ जणांचे ४३८ अर्ज पात्र झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शेकडो उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
माजी आ. दिलीप माने यांच्या विरोधात आ. सचिन कल्याणशेट्टी, सुरेश हसापुरे, बळीराम साठे, बाळासाहेब शेळके यांच्यासह विविध पक्षातील नेते एकत्रित आल्याने सर्वपक्षीय नेत्यांची ताकद वाढली आहे. मात्र, निवडून आल्यानंतर कोणाला सभापती, उपसभापती करायचे यावर नेत्यांचे एकमत होत नसल्याने सर्वपक्षीय गटातील बरेच नेते दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माजी आ. माने यांनी चांगले लोक सोबत येत असतील तर बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, ती कोणत्या गटांमध्ये होणार याबाबत उत्सुकता आहे.
0 Comments