Hot Posts

6/recent/ticker-posts

आव्हानात्मक काळातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार- बाळराजे पाटील

 आव्हानात्मक काळातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार- बाळराजे पाटील




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अतिशय आव्हानात्मक काळात लोकनेते अण्णांनी समाजकारणाबरोबर राजकारणातही यश मिळवले होते. अपयशाने खचून न जाता त्यांनी वेळोवेळी आपला गट सांभाळला. त्यामुळे अण्णांच्या कार्य प्रेरणेमुळेच माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३५ वर्ष आपण सत्तेत राहू शकलो. कार्यकर्त्याला जिवापाड सांभाळण्याची अण्णांची शिकवण अनगरकर- पाटील परिवार आजही विसरला नाही. गेल्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केल्यामुळेच ९६ हजार मतदान खेचून घेता आले. त्यामुळे यापुढील काळ जरी संघर्षाचा असला तरी अनगरकर- पाटील परिवार प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाही लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील पोखरापूर जि.प. गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या खवणी - सारोळे येथील आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, राहुल मोरे, भारत सुतकर, बाळासाहेब भोसले, ज्योत्स्नाताई पाटील, सिंधुताई वाघमारे, यशोदा कांबळे, रामदास चवरे, मोहन होनमाने, दत्ता काकडे, जरग, रामभाऊ शेळके, अनिल शिंगाडे यांच्यासह पोखरापूर, खवणी, सारोळे त्याचबरोबर पोखरापूर जि.प. गटातील गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळराजे पाटील पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या कार्यकर्त्यांच्या या संवाद बैठकीसाठी मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती पाहून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा सार्थ अभिमान वाटतो. यापूर्वीच्या कालावधीत ग्रामपंचायत पासून ते आमदारकी पर्यंत, झेडपीपासून दूध संघापर्यंत अशी सर्व सत्तास्थाने ताब्यात असल्याने कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत धावून जाण्याची भूमिका सार्थपणे पार पाडली. बदलत्या काळात निष्ठा आणि तत्व, विचार या गोष्टी कालबाह्य झाले आहेत. आजचा सोबतचा उद्या असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे कालपरत्वे पक्ष संघटनात्मक काम करत असताना नवे विचार अंगीकारावे लागतील. २०१४ ते २०१९ या कालावधीत कसलाही ठोस निधी येऊ शकला नव्हता, विकासकामे झाली नव्हती तरीही वीस हजाराच्या मताधिक्क्याने आपल्या उमेदवाराला जनतेने आमदार केले. मात्र, २०१९ ते २०२४ या कालावधीत चार हजार कोटी रुपयांची कामे आणूनही जर उमेदवार पराभूत होत असेल तर कार्यकर्त्यांना जनतेच्या मनातील नाराजीपर्यंत पोहोचून विकासाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. येत्या काळात होणाऱ्या जि.प., पंचायत समिती त्याचबरोबर मोहोळ आणि अनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि एकोप्याने नव्या उमेदीने कामाला लागावे, असे आवाहन बाळराजे पाटील यांनी केले.
याप्रसंगी शुभांगी लंबे, जरग, सिंधुताई वाघमारे, शाहीर सलगर, बाळासाहेब भोसले, राहुल मोरे, भारत सुतकर, प्रकाश चवरे, जोत्स्नाताई पाटील, राहुल कसबे यांनीही मनोगत व्यक्त केले.

चौकट 
तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज रहा
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी अनगरकर पाटील परिवारावर टोकाची टीका करून विकासकामांबाबतही निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवले. वर्षानुवर्ष केवळ पदावर राहून लेटरपॅडवर पक्षकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यापुढील काळात विरोधकांच्या टीकेला अभ्यासू आणि संविधानिक मार्गाने विकासात्मक मुद्द्यावर प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. विरोधकांना वेळच्यावेळी त्यांची जागा दाखवण्यासाठी तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहावे. 
-बाळराजे पाटील, चेअरमन, लोकनेते शुगर
Reactions

Post a Comment

0 Comments