शरद पवार उद्या सोलापुरात
नेते, कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकणार का ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शरद पवार हे पक्षातील पदाधिकारी व
कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती तसेच विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. विधानसभा निकालानंतर पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ती मरगळ दूर करून पवार त्यांच्यात उर्जितावस्था आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकसंध राष्ट्रवादी असतानाही सोलापुरात पक्षाची ताकद नव्हती. आता तर पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवक आणि ताकदवान नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहे. पवार गटात जे नेते राहिले आहेत ते सध्या पक्षात जास्त सक्रीय नाहीत. त्यामुळे पक्षाला मरगळ आली आहे. त्यामुळे आता पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे काम शरद पवार यांना करावे लागणार आहे. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे. त्यासाठी शरद पवार नेमकी कोणती राजकीय व्यूहरचना आखतात हे पाहणे देखील गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत माजी महापौर महेश कोठे यांनी पक्षाला नवी ताकद आणि उभारी देण्याचे काम केले होते. मात्र त्यांच्या अकाली निधनाने त्यांचे समर्थकही आता चिंतेत आहेत. कोठे यांच्या अचानक जाण्याने पक्षांमध्ये तसेच राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचे काम देखील सर्वेसर्वा शरद पवार यांना करावे लागणार आहे. पक्षात मनोहर सपाटे, यु.एन. बेरिया, भारत जाधव यासारखे जुने आणि अनुभावी नेत्यांसह कार्यकर्ते अद्यापही शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्यासह नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शरद पवार यांना आगामी निवडणुकीची खिंड लढवावी लागणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार, काय सल्ला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments