देव सगळ्यांचा, फक्त 'पासवाल्यांचा' नव्हे!
'श्रद्धा' ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. मंदिरे, यात्रा, जत्रा आणि उत्सव हे सर्व धार्मिक भावना आणि भक्तीच्या अभिव्यक्तीचे मार्ग आहेत. पण दुर्दैवाने आज हीच श्रद्धा काही ठिकाणी 'व्यवसाय' बनली आहे. विशेषतः तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर्शन पास या संकल्पनेच्या नावाखाली जे चालतंय, ती म्हणजे सरळसरळ लूट होय! आज सर्वच प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे गर्दीने गजबजलेली असतात. तिथे धनिक भाविकांची सोय करण्यासाठी 'व्हीआयपी दर्शन, फास्ट ट्रॅक पास, डोनेट अॅण्ड एंटर,' अशा संकल्पनांमुळे सामान्य भाविक मागे पडतो आणि पैसा असलेल्यांना देवदर्शन 'खरेदी' करता येतं. देवापर्यंत पोहोचण्यासाठी आता 'पास' लागतो आणि तोही कधी शेकडोंमध्ये, तर कधी हजारोंमध्ये!
ही लूटमार एवढीच मर्यादित नाही. दलाल मंडळी, एजंट्स, खास लोकांचे 'रेफरन्स' आणि बोगस वेबसाइट्स यांचं जाळं यामागे कार्यरत आहे. जेथे दर्शनासाठी २-३ तास वाट पाहणं अपेक्षित आहे, तिथे कुणी थेट १५ मिनिटांत मंदिराच्या गर्भगृहात पोहोचतो, तेही 'खास पास' दाखवून!
हा प्रश्न केवळ आर्थिक शोषणाचा नाही, तर धार्मिक समतेचा आणि नैतिकतेचाही आहे. देव ही सर्वसामान्यांची आशा आहे. त्याच्याही दर्शनासाठी वर्गवारी असेल, तर मग श्रद्धेचा अर्थच काय राहतो? सरकार आणि मंदिर ट्रस्ट यांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. ऑनलाइन प्रणाली पारदर्शक हवी, फ्री दर्शन रांग सुसज्ज असावी आणि दलालांचं साम्राज्य मोडून काढायला हवं. कारण देव सगळ्यांचा असतो, फक्त 'पासवाल्यांचा' नव्हे!
सागर पिंगळे (पुणे )
0 Comments