हरहर महादेव' गर्जनेत दुमदुमला मुंगीघाटाचा डोंगर
कावडी सोहळ्याने शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता; लाखो भाविकांची उपस्थिती
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत बूधवारी मुंगीघाटातील कावडसोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मानाच्या कावडी चढविताना 'हरहर महादेव' गर्जनेत मुंगीघाटाचा डोंगर अक्षरशः दुमदुमून गेला. भक्तीशक्तीचा हा विराट सोहळा पाहण्यासाठी मुंगीघाट परिसरात लाखो भाविकांची उपस्थिती होती. रात्री उशिरा सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शभू महादेवाच्या यात्रेस चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिवपार्वती हळदी सोहळ्याने प्रारंभ झाला, त्यानंतर अष्टमीच्या दिवशी शिवपार्वती विवाहसोहळा संपन्न झाला. तसेच याचदिवशी शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पागोटे (धज) बांधण्याचा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. नवमीच्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातील भातांगळी येथील देवाची करवली असलेल्या मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तर शुक्रवारी एकादशीच्या दिवशी लाखो शिवभक्तांनी एकादशीचा उपवास धरून महादेवाचे दर्शन घेतले तर सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरून येऊन दर्शन घेतले.
शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. शनिवारी द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजतगाजत पायरी मार्गाने आलेल्या जवळपास एक हजारहून अधिक कावडीनी करून जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय सकाळपासूनच शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगीघाटातील कावडीसोहळ्याचा थरार रंगला होता. सकाळी 11 वाजलेपासून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील लहानमोठ्या कावडी मुंगीघाटातून चढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 2 वाजल्यापासून सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण आदी ठिकाणच्या मानाच्या कावडी चढविण्यास प्रारंभ झाला. मुंगीघाट डोंगरावरून मानवी हातांची साखळी करून कावडी घेऊन चढविताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 'हरहर महादेव', 'म्हाद्या धाव' अशी शिवगर्जना करीत कावडीधारक भाविकांनी साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचे विराट दर्शन घडवून अवजड कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर केला. रोमहर्षक व नेत्रदीपक असा कावड सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी घाटमाथ्यावर उपस्थित असलेले लाखो शिवभक्त टाळ्यांचा गजर करत कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांचा उत्साह वाढवित होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर चढविण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या लाखो भाविकांनी एकच जल्लोष केला. डोंगर माथ्यावर कावड आल्यानंतर कावडीधारक भाविकांनी ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, हरहर महादेव शिवगर्जना करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत, कावडी नाचवून आनंद व्यक्त केला.
यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने माणचे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, सपोनि दत्तात्रय दराडे, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, शिंगणापूर सरपंच अनघा बडवे, उपसरपंच राजू पिसे, देवस्थानचे व्यवस्थापक मंदार पत्की यांनी मानाच्या कावडींचे स्वागत केले. सर्व कावडी मंदिराकडे वाजतगाजत गेल्यानंतर भुतोजीबुवा तेली यांच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली. कावडी सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक शिंगणापूर नगरीत दाखल झाले होते. शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शिंगणापूर ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांनी नेटकेपणाने नियोजन करून भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.
यांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन..
आमदार उत्तम जानकर, माजी आमदार राम सातपुते, अर्जुनसिंह मोहीते पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालूका वैद्यकिय शिंदे, डॉ. प्रियांका शिंदे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर,, तहसीलदार सूरेश शेजूळ, सहायक पोलिस निरीक्षक महारूद्र परजणे,
चौकट-- परीक्षा लांबणीवर गेल्याने भाविकांची संख्या घटली
यावर्षी शिंगणापूर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या घटल्याचे दिसून आले. राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. यावर्षी परीक्षा लांबणीवर गेल्याने मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या भाविकांची संख्या कमी दिसून आली. उष्णतेच्या लाटेचा फटकाही शिंगणापूर यात्रेला बसला असून उष्णतेच्या झळामुळे भाविक मुक्कामी न थांबता लगेच माघारी फिरत होते. या सर्वांचा परिणाम येथील व्यावसायिकांवर झाल्याचे दिसून आले.
0 Comments