श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात एम. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- अकोले खुर्द, तालुका माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५- २६ पासून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नवी दिल्ली यांच्याकडून एम. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली. एम. फार्म (फार्मास्युटिक्स) आणि एम. फार्म (फार्माकॉलॉजी) या दोन विषयांसाठी सदर मान्यता मिळाली आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत. प्रत्येक विभागात १५ जागा असतील.
गणपती फार्मसी महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय आहे जिथे एम. फार्म (फार्माकॉलॉजी) चा अभ्यासक्रम सुरू होत आहे. यामुळे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी पर्याय मिळेल. फार्मास्युटिकल क्षेत्रात संशोधन आणि रोजगाराच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
एम फार्मसी अभ्यासक्रमास परवानगी मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एम. फार्म पदवी मिळविण्याची संधी मिळेल आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये उच्च पदांसाठी नोकरी तसेच संशोधन करण्याची संधीं प्राप्त होईल अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ.आर. डी. बेंदगुडे यांनी दिली. जिल्ह्यातच उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याची सोय झाल्याने विद्यार्थ्यांना इतर शहरांना धाव घ्यावी लागणार नाही. तसेच महाविद्यालयातील शिक्षकांना सुद्धा त्यांच्या पीएचडी करिता ॲनिमल स्टडी करायचा असल्यास येथेच तो कमी खर्चामध्ये करता येईल. संस्थेच्या सुविधा, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक प्रयोगशाळा यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे यांनी दिला. यावेळी डॉ. सचिन सकट, डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. नामदेव शिंदे, प्रा. शिवराज ढगे व प्रा. शैलेश पेंदोर उपस्थित होते.
0 Comments