Hot Posts

6/recent/ticker-posts

काश्‍मिरात अडकलेल्यांपैकी चौघे सोलापुरात सुखरूप

 काश्‍मिरात अडकलेल्यांपैकी चौघे सोलापुरात सुखरूप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी सोलापुरातील १६९ जण गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. जम्मू-काश्‍मीरमधील या पर्यटकांना सोलापुरात सुखरूप आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वयाची भूमिका बजाविण्यात आली.

जम्मू काश्‍मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांपैकी ४ जण आज सोलापुरात सुखरूप परतले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मंगळवारी (ता. २२) हल्ला केला. त्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. यामध्ये सोलापुरातील कोण पर्यटक आहेत? याची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले. या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नसल्याची खात्री झाल्यानंतर या पर्यटकांना जिल्ह्यात सुखरूप आणण्यासाठी नियोजन करण्यात आले.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील टुरिस्ट कंपन्या यांच्यासह हेल्पलाईनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात होती. सोलापूर शहरातील ७७, माढ्यातील ५४, पंढरपुरातील २३, सांगोल्यातील ८ व माळशिरसमधील ७ पर्यटक पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले असल्याची माहिती संकलित करण्यात आली होती.

या पर्यटकांना सुखरूप सोलापुरात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाच्यावतीने समन्वय व संपर्क ठेवून पर्यटकांची व्यवस्था केली आहे. काहीजण खासगी विमानाने, शासनाच्या विमानाने महाराष्ट्रात येत आहेत. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व भाविक सुखरूप सोलापूर जिल्ह्यात येतील, अशी माहितीही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments