सोलापुरात १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गाववाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाच्या सोडती मंगळवारी काढण्यात आल्या. यातून ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. ज्या त्या तालुक्यातील तहसीलदारांच्या उपस्थितीत पुढील २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक कामाला लागले. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काहीजणांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसून आले.
अक्कलकोट तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीतून ठरले. यात हन्नूर जेऊर, नागणसूर, कुरनूर, शिरवळ, चुंगी, पितापूर, वागदरी, कर्जाळ, हैद्रा आदी नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत राहणाऱ्या गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटाला लाभले. यातील काही ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे. भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गावाच्या सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटातील महिलेला मिळाले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षणाद्वारे निश्चित झाले. यात टाकळी, कुडल हत्तरसंग (अनुसूचित जाती), बोरामणी, होटगी, नांदणी, गुंजेगाव (ओबीसी), नुसती, कासेगाव, कुंभारी, भंडारकवठे, आहेरवाडी आदी गावांचे सरपंचपद खुल्या गटाला मिळाले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण ठरविण्यात आले. यापैकी ४६ गावांना खुल्या गटातील आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात २३ महिलांचा समावेश आहे. माढा तालुक्यात अनुसूचित जाती ढवळस, आकुंबे, वडाची वाडी येथे आरक्षण निश्चित झाले. तर टेंभुर्णी, अंजनगाव खेलोबा, बारलोणी, पिंपळखुंटे, जामगाव, सापडणे, मोडनिंब आदी ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या निमगावसह पिंपळनेर, सुलतानपूर, उजनी, वाकाव, लऊळ आदी ठिकाणी खुल्या गटात महिला सरपंच होणार आहेत.
0 Comments