सोलापूर जिल्हा दूध संघाचा फैसला १४ एप्रिलपर्यंत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केल्याच्या आदेशावर सोमवारी (ता. ७) सुनावणी होणार आहे. दुग्धचे सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे ही सुनावणी होणार असून या सुनावणीनंतर सात दिवसांच्या आत (१४ एप्रिल) संचालक मंडळ की प्रशासकीय मंडळ याबाबत निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिलेल्या आदेशावर संचालक संभाजी मोरे यांनी सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे अपील केले होते. या अपिलावर सहनिबंधक पाटील यांच्याकडे हे प्रकरण सुरू आहे. त्यांनी संचालकांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे.
या स्थगितीच्या विरोधात विरवडे बु. (ता. मोहोळ) येथील चंद्रभागा दूध उत्पादक सहकारी संस्थेने याचिका दाखल करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी सहनिबंधक पाटील यांना हे आदेश दिले आहेत.
या प्रकरणातील जिल्हा सरकारी वकील म्हणतात की प्रशासक मंडळाने जिल्हा दूध संघाचा कार्यभार स्वीकारला आहे. परंतु दूध संघाचे दप्तर प्रशासकीय समितीकडे सोपवले गेले नाही, असा उल्लेखही न्यायमूर्ती बोरकर यांनी या आदेशात केला आहे.
अपिलाचा निर्णय येईपर्यंत, आजची ''जैसे थे'' स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देत न्यायमूर्ती बोरकर यांनी ही याचिका निकाली काढली आहे. न्यायमूर्ती बोरकर यांनी हे आदेश २ एप्रिल रोजी दिले आहेत. जिल्हा दूध संघाचा पदभार २ एप्रिल रोजी संचालक मंडळाकडे होता. त्यामुळे अपिलाचा निर्णय लागेपर्यंत व १४ एप्रिलपर्यंत जिल्हा दूध संघाचा कारभार संचालक मंडळाकडेच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.
0 Comments