अवकाळीमुळे १७ जिल्ह्यात १३ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान
पुणे (कटूसत्य वृत्त):- गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून, भाजीपाला तसेच फळपिकांनाही या अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून, त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणेसहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी, बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार १७ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण १३ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात प्रामुख्याने गहू व हरभरा या रब्बी पिकांचा समावेश आहे. काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी पिकांसह ज्वारी, मका बाजरी, तसेच भाजीपाला पिके व महत्त्वाच्या फळपिकांमध्ये केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, पपई, संत्रा, तसेच चारापिकांचा समावेश आहे.
सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून, येथील सहा तालुक्यांमध्ये ५ हजार ७९५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ५ हजार ४२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाने सुरुवात केली असून, त्याचा अंतिम अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असेही कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.
0 Comments